कुटुंबातील एकाला शासकीय सेवेत घेण्यासाठी मुख्यमंत्र्यासमवेत चर्चा करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 12:46 IST2020-06-27T12:44:09+5:302020-06-27T12:46:07+5:30
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आश्वासन; गृहमंत्री, आरोग्यमंत्र्यांनी घेतली शहीद सुनील काळे यांच्या कुटुंबियांची भेट

कुटुंबातील एकाला शासकीय सेवेत घेण्यासाठी मुख्यमंत्र्यासमवेत चर्चा करणार
सोलापूर : सीआरपीएफ जवान शहीद सुनील काळे यांनी देशासाठी दिलेले बलिदान व्यर्थ जाऊ दिले जाणार नाही़ त्यांच्या कुटुंबातील एकाला शासकीय सेवेत घेण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी लवकरच चर्चा करणार असून काळे कुटुंबियांना योग्य तो न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले.
मंगळवारी पहाटे साडेचार वाजता पुलवामामध्ये अतिरेक्यांच्या चकमकीत पानगाव (ता. बार्शी) येथील सीआरपीएफ जवान सुनील काळे शहीद झाले. त्यांच्यावर बुधवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले़ त्यानंतर शनिवारी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले.
यावेळी त्यांनी कुटुंबियांच्या अडचणी जाणून घेतल्या़ भेटीनंतर बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, शहीद जवान सुनील काळे यांचे गरीब परिवार आहे, त्यांच्या कुटुंबातील एकाला शासकीय नोकरी लागेल का, आर्थिक बळ देता येईल याबाबतचा विचार करणार आहोत, त्यांच्या कुटुंबातील एकाला शासकीय सेवेत घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करणार असून शासनाच्यावतीने जेवढी काही मदत करता येईल तेवढी प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगितले.
याचवेळी गृहमंत्र्यांनीही शहीद काळे कुटुंबियांना शासनाच्यावतीने जी काही मदत करता येईल ती लवकरात लवकर करण्यात येईल असे सांगितले़ यावेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस अधिक्षक मनोज पाटील आदी अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.