ग्रामसेवकांच्या बैठकीला खातेप्रमुखांची हजेरी
By admin | Published: June 20, 2014 12:44 AM2014-06-20T00:44:16+5:302014-06-20T00:44:16+5:30
सीईओंचा आदेश: प्रश्न तत्काळ मार्गी लागण्यासाठी उपक्रम
सोलापूर: गावपातळीवर जिल्हा परिषद पातळीवरील कामे तत्काळ मार्गी लागण्यासाठी सीईओ चंद्रकांत गुडेवार यांनी गुरुवारी नवा आदेश काढण्याच्या सूचना दिल्या. तालुका पातळीवरील ग्रामसेवकांच्या बैठकीला एका खातेप्रमुखाने उपस्थित राहण्याबाबतचे पत्र काढण्यास सामान्य प्रशासन विभागाला त्यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेचा कारभार गतिमान होण्यासाठी चंद्रकांत गुडेवार सीईओपदाचा पदभार घेतल्यापासून नवनवीन सूचना देत आदेश काढण्यास सांगत आहेत. गुरुवारी त्यांनी ग्रामसेवक बैठकीला उपस्थित राहण्याबाबत आदेश काढण्याची सूचना दिली. ग्रामसेवकांच्या बैठकीत गटविकास अधिकारी व तालुका पातळीवरील अधिकारी कामाचा आढावा घेतात. या बैठकीला जिल्हा परिषदेचा खातेप्रमुख उपस्थित राहणार आहे. ग्रामसेवक व पंचायत समितीच्या कामातील अडचणी थेट सीईओपर्यंत पोहोचविण्यासाठी व जिल्हा परिषद पातळीवरील कामे मार्गी लागण्यासाठी या अधिकाऱ्यांची मदत होणार आहे. नियुक्त केलेल्या अधिकाऱ्याने ग्रामसेवकांच्या बैठकीला सुरुवातीपासून शेवटपर्यंत उपस्थित राहावयाचे आहे. सीईओंनी दिलेल्या नव्या सूचना, शासनाची कामकाजाची पद्धत ग्रामसेवकांना सांगून त्यांच्या अडचणी व जि. प. पातळीवरच्या कामाची नोट तयार करुन सीईओंना सादर करावयाची आहे. याबाबतच्या सूचना गुरुवारी गुडेवार यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रभू जाधव यांना दिल्या. यामुळे अनेक प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे.
-------------------------------
ग्रामपंचायती व पंचायत समिती जिल्हा परिषदेला कामासाठी पत्र देते. ती कामे तत्काळ मार्गी लागण्यासाठी ग्रामसेवकांच्या बैठकीला गेलेल्या अधिकाऱ्यांनी नोट्स तयार करून सीईओंना द्यावयाची आहे.
-चंद्रकांत गुडेवार
-जि. प. सीईओ (प्रभारी)