मुख्याध्यापकांच्या कार्यालयाला सील ठोकले अन् दहावी विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र लटकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2020 12:18 PM2020-02-18T12:18:06+5:302020-02-18T12:20:56+5:30
मिळकतकर कारवाई; लोकसेवा हायस्कूलचे सील धनादेश वटल्यानंतरच काढणार
सोलापूर : महापालिकेचा मिळकतकर थकविणाºया लोकसेवा हायस्कूलने सोमवारी १२ लाख ७५ हजार रुपयांचा धनादेश कर संकलन अधिकाºयांकडे जमा केला. धनादेश वटल्यानंतरच मुख्याध्यापकांच्या कार्यालयाचे सील काढणार, असे अधिकाºयांनी बजावले. मात्र धनादेश वटण्याबाबत सांगू शकत नाही. दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे कार्यालयात अडकली आहेत, असे मुख्याध्यापकांकडून सांगण्यात आले.
मनपाकडील मिळकतकराची थकबाकी न भरल्याने लोकसेवा आणि विडी घरकूल येथील सोशल हायस्कूलच्या मुख्याध्यापकांचे कार्यालय सील करण्यात आले आहे. लोकसेवा हायस्कूलकडे तीन वर्षांपासूनची १५ लाख रुपयांची थकबाकी आहे. यापोटी सोमवारी मुख्याध्यापक अनिल धोत्रे यांनी १२ लाख ७५ हजार रुपयांचा धनादेश दिला. धनादेश वटल्यानंतरच मुख्याध्यापकांच्या कार्यालयाचे सील काढणार, असे कर संकलन प्रमुख पी. व्ही. थडसरे यांनी सांगितले.
शासनाकडून अनुदान प्रलंबित आहे. दहावीच्या मुलांची प्रवेशपत्रे मुख्याध्यापकांच्या कार्यालयात आहेत. तीन मार्चपासून परीक्षा सुरू होणार आहे. मुलांना प्रवेशपत्रे द्यायची आहेत, असे धोत्रे म्हणाले. मात्र संस्था विद्यार्थ्यांकडून फी घेते. फी न दिल्यास कारवाई करते. मिळकत कर भरायला यापूर्वी अडचण नव्हती. आताच अडचण कशी? वारंवार कळवूनही आपण कर भरला नाही. मनपाला दाद दिली नाही म्हणूनच ही कारवाई झाल्याचे थडसरे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, दुसरीकडे सोशल हायस्कूलने अद्यापही दाद दिलेली नाही. वरिष्ठांच्या आदेशान्वये आणखी कडक कारवाई होईल, असा इशाराही थडसरे यांनी दिला.
करवसुलीला प्रतिसाद
- मनपा आयुक्त दीपक तावरे यांनी थकीत मिळकतकरावर आकारलेल्या दंडामध्ये ७५ टक्के माफी दिली आहे. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत यंदा जादा वसुली होत आहे. शनिवारी एकाच दिवशी ३६ लाख रुपयांचा कर जमा झाला. सोमवारी ३८ लाख रुपयांचा कर जमा झाल्याचे थडसरे यांनी सांगितले. तीन लाखांपेक्षा अधिकचा कर थकविणाºया १२४ मिळकतदारांची नावे डिजिटल फलकावर लावण्यात येणार आहेत. यावर कार्यवाही सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
शेळगी येथे पाच नळ तोडले
- हद्दवाढ भागातील थकबाकीदारांवर कारवाई सुरू आहे. कर संकलन अधिकाºयांनी सोमवारी शेळगी भागातील पाच नळ कनेक्शन तोडले. याच भागात मंगळवारी कारवाई सुरू राहणार आहे. यानंतर हद्दवाढ भागातील इतर वसाहतींमध्ये कारवाई होणार आहे.