आरोग्य केंद्रांच्या माथी सोलर साहित्य
By Admin | Published: June 9, 2014 01:06 AM2014-06-09T01:06:57+5:302014-06-09T01:06:57+5:30
शासनानेच दिला ठेकेदार: मागणी नसलेले साहित्य पाठविण्याचे प्रकार
सोलापूर:ज्याची गरज आहे ते मागणी करुनही मिळत नाही, परंतु शासन पातळीवरुन मागणी न करताही सहज मिळत आहे. जिल्ह्यातील चार आरोग्य केंद्रे तसेच ३० उपकेंद्रांना एक कोटी ६९ लाख २१ हजार रुपयांचे सोलर पथदिवे, सोलर पॉवर पॅक व सोलर वॉटर हिटर बसविण्याचे आदेश शासन पातळीवरुनच दिले आहेत.
अनुशेषांतर्गतच्या निधीतून राज्यभरातच निधी खर्च केला असून, सोलापूरच्या वाट्याला एक कोटी ६९ लाख २१ हजार रुपये आले आहेत. आरोग्य केंद्राला व उपकेंद्राला जे मागितले जाते त्याचा विचार शासन पातळीवर लवकर केला जात नाही. परंतु कंपन्या व ठेकेदारांच्या आग्रहानुसार अनेक वस्तंूची खरेदी करुन जिल्हास्तरावर पाठवल्या जात आहेत. त्यामध्ये यावर्षी सोलर पथदिवे, सोलर पॉवर पॅक व सोलर वॉटर हिटर हे साहित्य पाठविण्यात आले आहे. या साहित्याचा पुरवठादार शासनाकडूनच ठरलेला असतो व तो थेट साहित्य बसवून जातो. ते चालते की बंद असते, याची तक्रार कोणीच करीत नाही कारण ते वापरात येईलच असे सांगता येत नाही.
---------------------------------
जि.प.कडून खरेदी नाही?
जिल्हा परिषद आरोग्य व शिक्षण खात्याला सेस व जिल्हा नियोजनने दिलेला निधी खर्च करण्यासाठी मंजुरी मिळत नाही. मंजुरी मिळाली तर ठेकेदार मिळत नाही. मिळाला तर त्याला मंजुरी आदेश देण्यासाठी अनेकांना भेटावे लागते. ते परवडेनासे झाल्यानेच बेंचसाठीचे ९८ लाख रुपये खर्च झाले नाहीत. परंतु शासन पातळीवरुन आलेले स्वीकारण्याशिवाय पर्यायच नाही.
----------------------------------
काय आहे सौर साहित्य ?
प्रति सोलर दिव्याचा दर २५,६८५ रुपये, प्रति सोलर पॉवर पॅकचा २ लाख ८१ हजार, प्रति सोलर वॉटरसाठी एक लाख २७ हजार ३३० रुपये
प्रत्येक आरोग्य केंद्र व उपकेंद्राला प्रत्येकी चार पथदिवे तर प्रत्येकी एक सोलर पॉवर पॅक, सोलर वॉटर हिटर सिस्टीम
चार आरोग्य केंद्रांसाठी एकूण १७ लाख ५८ हजार तर उपकेंद्रासाठी एक कोटी ५१ लाख ६३ हजार असे एकूण एक कोटी ६९ लाख २१ हजार रुपये सौर साहित्यासाठी खर्च
--------------------------------
बंद दवाखाने अन् उपकेंद्रेही
मागील महिन्यात कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती जालिंधर लांडे यांनी जनावरांच्या दवाखान्यांची तपासणी केली होती. बहुतेक दवाखाने बंद व उघड्या असलेल्या दवाखान्यात डॉक्टर नव्हते. अशीच अवस्था प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांची आहे. अनेक उपकेंदे्र उघडलीच जात नाहीत. आरोग्य केंद्रात तर कर्मचाऱ्यांची संख्या पाहता रुग्णांची वर्दळ दिसायला हवी. मात्र कर्मचारी संख्येइतकेही रुग्ण आरोग्य केंद्रात येत नाहीत. अशा आरोग्य केंद्र व उपकेंद्राला सोलर पथदिवे, सोलर पॉवर पॅक व सोलर वॉटर हिटर बसविले जात आहेत.