३१ हजार २८८ विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:15 AM2021-07-12T04:15:08+5:302021-07-12T04:15:08+5:30
सांगोला : राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत अवघ्या २० दिवसात सांगोला तालुक्यातील अंगणवाडी,जिल्हा परिषद शाळा व हायस्कूलमधील ० ते १८ ...
सांगोला : राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत अवघ्या २० दिवसात सांगोला तालुक्यातील अंगणवाडी,जिल्हा परिषद शाळा व हायस्कूलमधील ० ते १८ वर्षे वयोगटातील ३१ हजार २८८ विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तपासणी दरम्यान ३५२ बालकांना गंभीर आजाराची लक्षणे आढळून आली आहेत. तसेच ८ मुलांना कोरोनाची लागण झाली आहे तर ३२ मुले कोरोनासदृश आढळून आले असल्याची माहिती सांगोला ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. उत्तम फुले यांनी दिली आहे.
---
प्राथमिक विद्यामंदिरात आरोग्य तपासणी
दक्षिण सोलापूर : येथील जनसेवा प्राथमिक विद्यामंदिरात 'माझे विद्यार्थी, माझी जबाबदारी' या मोहिमेंतर्गत सोलापूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या मार्गदर्शनानुसार शाळेत आरोग्य तपासणी मोहीम राबविण्यात आली. डॉ. सदाफुले यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. या आरोग्य तपासणी शिबिरात एकूण १०४ विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक नितीन भांगे, शशिकला वाघमोडे, वैशाली बिराजदार, बाळासाहेब पाटील उपस्थित होते.
----
कासारवाडी झेडपी शाळेत वृक्षारोपण
बार्शी : कासारवाडी झेडपी शाळेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या प्रेरणेतून ‘एक पद, एक झाड' या उपक्रमाची अंमलबजावणी केली असून विविध वृक्षांची लागवड करण्यात आली. मुख्याध्यापक सुधाकर बडे यांनी प्रास्ताविक केले. शशिकांत बसनगौडर व राजीव कांदे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. महादेव शिंदे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी कासारवाडीच्या सरपंच अश्विनी नितीन मंडलिक, उपसरपंच सुधीर गायकवाड, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अजिंक्य कदम, तंटामुक्त समिती अध्यक्ष शरद गुंड, माजी सरपंच राकेश मंडलिक, ग्रामसेवक राहुल गरड, कोरफळे केंद्राचे केंद्रप्रमुख महादेव शिंदे आदी उपस्थित होते.
---
भोंदूबाबावर कारवाईची मागणी
सोलापूर : येथील माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी भोंदूबाबावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पदाधिकारी संगप्पा कांबळे, नबी तांबोळी, इद्रीस सिद्दीकी, अशोक म्हस्के, हरीश फडतरे, नबी चांबोशी, गिना तांबोळी आदींनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिले. एक भोंदूबाबा शिवीगाळ करणे, जादूटोणा करणे असे प्रकार करत आहे. याप्रकरणी योग्य न्याय द्यावा, अशी मागणी या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
---
पाचवीचा वर्ग सुरू करण्याची मागणी
मंगळवेढा : गुणवत्ता वाढीसाठी कोट्यवधीचा खर्च केला जात असताना शहरातील नगरपालिका मुलांची शाळा क्र २ मध्ये तांत्रिक कारणाचा आधार घेत पाचवीचा वर्ग बंद करण्याच्या निर्णयाविरोधात आंदोलन करण्याचा इशारा पालकांनी नगरपालिकेला दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे. पाचवीचा वर्ग सुरू ठेवण्यासंदर्भात मुख्याधिकारी निशिकांत परचंडराव, नगराध्यक्ष अरुणा माळी, उपनगराध्यक्ष चंद्रकांत घुले, पक्षनेते अजित जगताप, सभापती प्रवीण खवतोडे यांना भेटून येथील पाचवीचा वर्ग पूर्ववत सुरू ठेवण्याची मागणी केली.
----
कल्याणनगरात ६० जणांची आरोग्य तपासणी
दक्षिण सोलापूर : जुळे सोलापुरातील प्रभाग २६ मधील कल्याणनगरमध्ये लोकमंगल फाउंडेशनतर्फे घेण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरात ६० जणांची तपासणी करण्यात आली. येथील एस. बी. हायस्कूलमध्ये झालेल्या या शिबिराचे उद्घाटन नगरसेविका राजश्री चव्हाण यांच्या हस्ते झाले. यावेळी मुख्याध्यापक मोहिते, डॉ. राजशेखर जेऊरे, सूरज जाधव, संजय पाटील, सोहेल मुजावर, सिमरन मुजावर, श्रीशैल हिरेमठ, आरिफ शेख, इराया स्वामी, वीरेश हुक्केरी, ओंकार म्हमाणे, दिनेश वाघमारे, मयूर दिक्षे, रुद्रेश स्वामी उपस्थित होते.
---
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वारसांना विमा लाभ
सोलापूर : कोरोनामुळे मयत पावलेल्या अंगणवाडी सेविकांच्या वारसांना विमा कवच योजनेतून पन्नास लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश देण्यात आला. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते हे धनादेश सुपूर्द करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, महिला व बालकल्याण समिती सभापती स्वाती शटगार, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी जावेद शेख, जिल्हा परिषद सदस्य थोरात, बालविकास प्रकल्प अधिकारी बालाजी आल्लडवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
---
बसपाचे केंद्र, राज्याच्या विरोधात मंगळवारी धरणे
सोलापूर : बहुजन समाज पार्टीतर्फे १३ जुलैला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारी एक वाजता केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात धरणे देण्यात येणार आहे अशी माहिती प्रदेश सचिव प्रशांत लोकरे यांनी दिली. विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येणार आहे. अनुसूचित जाती जमाती यांची पदोन्नती कायम ठेवावी, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे, शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव द्यावा, पेट्रोल-डिझेल, गॅसचा दर कमी करावा, खाद्यतेलाचे भाव कमी करण्यात यावेत, वाढती महागाई कमी करण्यात यावी आदी मागण्या आहेत. यावेळी पत्रकार परिषदेस शहराध्यक्ष देवा उघडे, अमर साबळे, सुहास सुरवसे, योगेश गायकवाड, नागनाथ गायकवाड आदी उपस्थित होते.
---