रेमडेसिविर इंजेक्शनबाबत आरोग्य विभागाने हात झटकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:21 AM2021-04-15T04:21:20+5:302021-04-15T04:21:20+5:30
सांगोला : शहर व तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना गंभीर असलेल्या रुग्णांना बेड उपलब्ध करून देणे, रेमडेसिविर इंजेक्शन ...
सांगोला : शहर व तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना गंभीर असलेल्या रुग्णांना बेड उपलब्ध करून देणे, रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य विभागाने हात झटकले आहेत. तालुका वैद्यकीय अधिकारी आपल्या कार्यालयातच बसून राहात असल्याने ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा वाऱ्यावर आहे.
आरोग्य विभाग व अधिकारी आपली जबाबदारी पार पाडणार नसतील तर सर्वसामान्यांनी करायचे काय? याचे योग्य निदान करणार कोण? रूग्णांना न्याय देणार कोण? असे एक ना अनेक प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात निर्माण होत आहेत.
सांगोला तालुक्यात कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शासनाने कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर देण्यास सांगितले आहे. मात्र, सांगोला तालुक्यात आरोग्य विभागाकडून याची योग्यप्रकारे अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येत आहे. ग्रामीण भागातील रुग्णांना कोणतीही संपर्क यंत्रणा किंवा आरोग्य विभागाची माहिती यंत्रणा कार्यान्वित नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे आरोग्य विभागाचा सावळा गोंधळ चव्हाट्यावर आला आहे.
आरोग्य यंत्रणा वाऱ्यावर
आरोग्य विभागाचा कारभार रामभरोसे असून, अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये समन्वय नाही, तर आरोग्य विभागात कोरोना आकडेवारीचे फक्त कागदी घोडे नाचवले जात आहेत. आरोग्य यंत्रणा वाऱ्यावर असल्याने तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या कामाबाबत नाराजीचा सूर आहे.
दरम्यान, तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना नगरपालिका, पोलीस आणि महसूल प्रशासनाशिवाय कोणीही हा विषय गांभीर्याने घेताना दिसत नाही. पैसे भरल्याशिवाय रुग्णांना उपचारासाठी दाखल करून घेतले जात नाही. अनेक कोरोनाबाधित रुग्णांना उपचाराअभावी ताटकळत थांबावे लागत आहे.