आरोग्याचा पंचनामा; कोरोनासाठी खरेदी केले साबण, स्टेथोस्कोप, नेबुलायझर...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2020 11:02 AM2020-07-20T11:02:53+5:302020-07-20T11:06:29+5:30
सोलापूर जिल्हा परिषदेने केली खरेदी: पदाधिकाºयांच्या आक्षेपामुळे निर्माण झाला वाद
राजकुमार सारोळे
सोलापूर : कोरोना विषाणू संसर्गाच्या उपाययोजनेसाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने चक्क डॉक्टरांसाठी स्टेथोस्कोप, साबण आणि नेबुलायझरची (वाफ घेण्याचे यंत्र) खरेदी केल्याचे दिसून आले आहे.
जिल्ह्यात एकीकडे कोरोना महामारीचा संसर्ग वाढत असताना दुसरीकडे झेडपीच्या आरोग्य विभागाच्या खरेदीचा वाद विकोपाला गेला आहे. विशेष म्हणजे कोरोना महामारी सुरू झाल्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी मार्चअखेर जिल्हा नियोजनमधून जिल्हा परिषदेला पैसे दिले. पण नियोजनाअभावी खरेदी प्रक्रिया लांबली.
डॉक्टर, आरोग्य कर्मचाºयांची सुरक्षा साहित्य व औषधांची मागणी सुरू केल्यावर लोकप्रतिनिधींनी याबाबत ओरड केली. दोन महिन्यांच्या विलंबानंतर टेंडरमध्ये मंजूर झालेल्या संस्थांना ४ जूनला वर्कआॅर्डर देण्यात आली. गरजेच्या वस्तूंची आरसीवरून खरेदी केल्याचे स्पष्टीकरण मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांनी दिले आहे. पण गरजेच्या गोष्टी कोणत्या याचा आराखडाच आरोग्य विभागाकडे नसल्याचे दिसून येत आहे.
कोरोना विषाणू संसर्गजन्य असल्याने सुरक्षेसाठी पीपीई किट, सॅनिटायझर, हातमोजे, मास्क हे साहित्य गरजेचे होते. पण त्याऐवजी आरोग्य विभागाने चक्क स्टेथोस्कोप, नेबुलायझर आणि साबणाची खरेदी केली. कोरोना महामारीच्या काळात प्रशासनाने पदाधिकाºयांना विश्वासात न घेता परस्पर या साहित्यांची खरेदी केली. कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असताना अनेक आरोग्य केंदे्र व उपकेंद्रातील कर्मचाºयांकडे सुरक्षा साहित्य व औषधे नसल्याने ओरड झाली. गेल्या आठवड्यात झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत यावरून गोंधळ झाला.
स्टेथोस्कोपची आवश्यकता काय?
कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर ५२0 स्टेथोस्कोप खरेदी करण्यात आले आहेत. महामारीच्या काळात कोणताही डॉक्टर येणाºया रुग्णाला हात लावत नसताना स्टेथोस्कोपची गरज काय, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. त्याचबरोबर नेबुलायझर खरेदी करण्यात आले आहे.
शासनाच्या आरसीप्रमाणे साहित्यांची खरेदी केली. ९९ रुपयांचा साबण थेट कंपनीकडून २७ रुपयाला खरेदी केला. साबण कर्मचाºयांना वैयक्तिक वापरासाठी दिला आहे.
- प्रकाश वायचळ,
मुख्य कार्यकारी अधिकारी
कोरोना साथीचे नाव पुढे करून अनेक अनावश्यक साहित्यांची खरेदी झाली आहे. आरोग्य केंद्राला नेमके काय साहित्य दिले, याची मी स्वत: तपासणी करीत फिरत आहे.
-अनिरुद्ध कांबळे,
अध्यक्ष, जिल्हा परिषद