आरोग्य केंद्रं नसलेल्या गावांमध्ये एमबीबीएस विद्यार्थी देणार आरोग्य सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2022 05:31 PM2022-04-03T17:31:30+5:302022-04-03T17:31:36+5:30

गावे घेणार दत्तक : एमबीबीएस शिक्षणात बदल

Health services will be provided by MBBS students in villages without health centers | आरोग्य केंद्रं नसलेल्या गावांमध्ये एमबीबीएस विद्यार्थी देणार आरोग्य सेवा

आरोग्य केंद्रं नसलेल्या गावांमध्ये एमबीबीएस विद्यार्थी देणार आरोग्य सेवा

googlenewsNext

सोलापूर : नॅशनल मेडिकल कमिशनने (एनएमसी) एमबीबीएसच्या अभ्यासक्रमात बदल केला आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना गाव दत्तक घ्यायचे आहे. ज्या गावात प्राथमिक आरोग्य केंद्र नाही, अशाच गावांची निवड विद्यार्थ्यांना करावी लागणार आहे.

एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांना आधी तिसऱ्या वर्षापासून फिल्ड व्हिजिट करावी लागत होती. नव्या नियमामुळे आता पहिल्या वर्षापासून गावात रुग्णसेवा करावी लागणार आहे. अनेक गावांत डॉक्टर उपलब्ध नसतात. एखाद्या गावात डॉक्टर असले तरी ते एमबीबीएस झालेले नसतात. त्यामुळे गावकऱ्यांना चांगली रुग्णसेवा मिळत नाही. याचा विचार करून हा नवा बदल करण्यात आला आहे. जेणेकरून ग्रामीण भागातील वैद्यकीय सेवा सुधारतील.

ऑगस्ट २०१९ मध्ये सादर करण्यात आलेला नवीन अभ्यासक्रमात फाऊंडेशन कोर्सेस सुरू करण्यात आले आहेत, ज्यामध्ये फॅमिली ॲडॉप्शन प्रोग्राम, योग, ध्यान यांचा समावेश आहे. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांना नवीन अभ्यासक्रम लागू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

----------

सिव्हिलमध्ये दरवर्षी १५० विद्यार्थी

डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी हे छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात (सिव्हिल) रुग्णसेवा देतात. महाविद्यालयात दरवर्षी १५० विद्यार्थी प्रवेश घेतात. चार वर्षांचे एकूण सहाशे विद्यार्थी आता रुग्णसेवा देण्यासाठी सज्ज असणार आहेत.

----------

विद्यार्थ्यांना मराठी शिकावी लागणार

सोलापुरात डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच अश्विनी वैद्यकीय महाविद्यालय आहे. या महाविद्यालयांत महाराष्ट्रासोबतच इतर राज्यांतून अनेक विद्यार्थी शिकण्यास येतात. त्यामुळे त्यांना मराठी भाषेचे ज्ञान नसते. अनेकदा रुग्णांच्या समस्या कळण्यास अडचणी निर्माण होतात. त्यामुळे या विद्यार्थ्यांना आता मराठी भाषेचे मूलभूत ज्ञान देण्यात येणार आहे.

------

जिल्ह्यात ७७ प्राथमिक आरोग्य केंद्र तर ४३१ उपकेंद्र

सोलापूर जिल्ह्यात विविध ठिकाणी असे ७७ प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत, तर या आरोग्य केंद्राच्या अंतर्गत ४३१ उपकेंद्र आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रांमार्फत तातडीच्या वैद्यकीय सेवा, बाह्यरुग्ण कक्ष, आंतररुग्ण कक्ष, शस्त्रक्रिया सेवा, प्रयोगशाळा सेवा, विविध राष्ट्रीय कार्यक्रम राबविणे, कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत सेवा देणे व उपकेंद्रांकडून संदर्भित केलेल्या रुग्णांवर उपचार या आरोग्य सेवा दिल्या जातात.

 

Web Title: Health services will be provided by MBBS students in villages without health centers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.