अकलूज, बोरामणीला आरोग्य पथके रवाना; आढळले तीन संशयित रुग्ण...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 11:42 AM2020-05-27T11:42:28+5:302020-05-27T11:53:25+5:30
सोलापूर जिल्हा परिषद आरोग्य विभागाची खबरदारी; सील करण्याची गरज आहे काय याची तपासणी सुरू
सोलापूर : सोलापूर शहरानंतर आता ग्रामीण भागातही ‘कोरोना’चे रुग्ण आढळत आहेत. बार्शी तालुक्यानंतर आता माळशिरस व दक्षिण सोलापूर तालुक्यात संशयित रुग्ण आढळल्याने बुधवारी सकाळी अकलूज व बोरामणी येथे आरोग्य विभागाची पथके तपासणीसाठी रवाना करण्यात आली आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार यांनी दिली.
अकलुज येथील काही संशयितांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यातील दोघांमध्ये लक्षणे आढळल्याने त्यांच्या निवासी परिसरातील पाहणीसाठी आरोग्य पथकाने सर्वेक्षणास सुरूवात केली आहे. त्याचबरोबर सोलापूर शहर पोलीस दलातील व बोरामणी येथील रहिवासी असलेल्या पोलिसाला त्रास होऊ लागल्याने उपचारास दाखल करण्यात आले आहे. या संशयितांचे अहवाल तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहे होते. बुधवारी सकाळी २९ जणांचे अहवाल पॉझीटीव्ह असल्याचे जिल्हा प्रशासनाने जाहीर केले आहे. या धर्तीवर खबरदारीची उपाययोजना म्हणून आरोग्य विभागाने ही पावले उचलली असल्याचे डॉ. जमादार यांनी सांगितले.
मंगळवारी बार्शी तालुक्यातील जामगाव येथील एका रुग्णाचा अहवाल पॉझीटिव्ह आला आहे. त्या आधी पुण्यात दाखल केलेल्या एका रुग्णाचा अहवाल आलेला आहे. आता माळशिरस तालुक्यातील अकलुज येथील दोन तर दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी येथील एक संशयित आहे. या संशयितांची हिस्ट्री तपासली जात आहे.