Heart Day Story; हृदयविकाराने तोडली वयाची बंधने; शंका येताच तपासणी करा !
By Appasaheb.patil | Published: September 29, 2022 12:58 PM2022-09-29T12:58:13+5:302022-09-29T12:58:21+5:30
तिशीतच येतोय हार्टअटॅक; तरुणांनो सवयी बदला अन् आरोग्य जपा
आप्पासाहेब पाटील
सोलापूर : वयाच्या तिशीत पोहोचल्यानंतर प्रत्येकाच्या खांद्यावर जबाबदारीचं ओझं वाढतं. व्यावसायिक स्पर्धेमुळे काम वाढतं. कुटुंबाकडेही लक्ष द्यायचं असतं. या सर्व व्यापात लोक स्वत:च्या शरीराकडे फारसं लक्ष देत नाहीत. कामाच्या व्यापात खाण्या-पिण्याच्या सवयीत बदल झाल्याने, शरीराकडे दुर्लक्ष होऊन आजारांना आयतं आमंत्रण मिळतं. आधी हार्ट अटॅक पन्नाशीत यायचा. आता मात्र तिशीतच हार्टअटॅक येत असल्यानं तरुण पिढीचं हृदय कमकुवत करत असल्याचे धक्कादायक वास्तव दररोज समोर येत आहे.
शरीराकडे लक्ष दिलं तर वाढतं वय आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे होणाऱ्या आजारांना आपल्याला दूर ठेवता येईल. आजार झाल्यावर धावपळ करण्यापेक्षा आजार प्रतिबंध करण्यावर भर असला पाहिजे. वेळीच आणि योग्य निदान झाल्याने आजार प्रतिबंध करणं शक्य आहे. यासाठी वैद्यकीय तपासणी केली पाहिजे असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.
---------
दरवर्षी चाचणी करणं महत्त्वाचं
लठ्ठ, मधुमेही आणि हृदयरोग असलेल्यांनी दरवर्षी आपल्या शरीराची संपूर्ण चाचणी केली पाहिजे. काहींच्या हृदयाचे ठोके अनियंत्रित असतात. त्यासाठी डॉक्टर ईसीजी टेस्ट करण्याचा सल्ला देतात. हृदयाचे कार्य व्यवस्थित सुरू आहे का नाही हे ईसीजी टेस्ट केल्याने कळतं. शिवाय शंका आल्यास आपल्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे.
----------
धूम्रपान, मद्यपान करणाऱ्यांना अधिक धोका
धूम्रपान हे २५ टक्के हृदयरोगाने मृत्युमुखी पडण्यास कारणीभूत ठरते. शिवाय मद्यपान स्वतंत्रपणे हृदयरोगास कारणीभूत असते. त्यामुळे शक्यतो धूम्रपान व मद्यपान करणाऱ्यांनी वेळीच सावध व्हायला हवे असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.
-----------
संतती नियमनाच्या गोळ्या घेणे टाळा
ज्या स्त्रिया संतती नियमनाच्या गोळ्या नियमित घेत असतात अशांना हृदयरोगाचा धोका अधिक असतो. याचे प्रमाण ३० ते ४० टक्के एवढे आहे. स्त्रियांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे. घरच्या कामात महिला आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात हे चुकीचे आहे.
------------
रक्तदाब, मधुमेह, कोलेस्ट्रॉल रुग्णांनो सावधान
ज्या व्यक्तीला उच्च रक्तदाब असतो त्यांना हृदयरोग होण्याचा धोका इतरांपेक्षा अधिक असतो. शिवाय ज्या व्यक्तीच्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण जास्त असते. त्यांना हृदयरोगाचा धोका जास्त असतो. मधुमेह असणाऱ्या व्यक्तींना हृदयरोग होण्याचा धोका हा २ ते ३ पटीने जास्त असतो. शारीरिक निष्क्रियता तसेच आरामदायी जीवन हृदयरोग होण्यास कारणीभूत असते.
-----------
तणाव कमी करणे, मानसिक आणि भावनिक आरोग्यावर लक्ष देणे, शारीरिक वाहिन्या आणि उत्साही मार्ग पंचकर्माद्वारे स्वच्छ करणे, संपूर्ण शरीरप्रणालीमध्ये योग आणि प्राणायामाद्वारे प्राणवायूच्या निरोगी प्रवाहाला चालना देणे, जठराग्नी प्रज्वलित करणे, शरीरात तयार झालेले अपक्व आहार रस साफ करणे, रस आदी धातूंचे पोषण सुधारणे आणि याद्वारे ओजस् वृद्धीला चालना देणे इत्यादी बाबींचे पालन करून हृदयाचे आरोग्य वाढवले जाऊ शकते.
- डॉ. ऋषभ मंडलेचा, आयुर्वेद तज्ज्ञ
---------