बापरे! किती हे ऊन... आता सोलापूरात शाळा सकाळीच
By रवींद्र देशमुख | Published: February 28, 2023 04:03 PM2023-02-28T16:03:48+5:302023-02-28T16:08:21+5:30
मागील काही दिवसांपासून सोलापूर शहरातील तापमानात सातत्याने वाढ होत आहे.
सोलापूर : उन्हामुळे नुसता वैताग आलाय... लेकरांना तर चटके सहन होईनात.. अंगाची लाहीलाही करणाऱ्या उन्हाबद्दल प्रतिक्रिया.. या साऱ्यांचा विचार करून जिल्हा परिषदने 1 मार्चपासून शाळा सकाळच्या सत्रात भरविण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षणाधिकारी संजय जावीर यांनी पत्रान्वये ही माहिती दिली. शाळा सकाळच्या सत्रात सकाळी ७.३० ते ११.३० या वेळेत भरविण्याबाबत येणार आहेत.
मागील काही दिवसांपासून सोलापूर शहरातील तापमानात सातत्याने वाढ होत आहे. सोलापूरचे तापमान ३७ अंशावर गेले आहे. वाढत्या उन्हामुळे शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत आहे. दुपारच्या सत्रात बाहेर पडणारे लोकांची संख्या कमी झाली आहे. या वाढत्या उन्हात शाळेतील मुलांना त्रास होऊ नये यासाठी जिल्हा परिषदेने सकाळच्या सत्रात शाळा भरविण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा आदेश शिक्षणाधिकारी संजय जावीर यांनी नुकताच प्रसिध्द केला आहे.
सध्या माध्यामिक सत्रातील बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहेत. या परीक्षा कामांसाठी जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी व्यस्त आहेत. कॉफीमुक्त अभियान राबविण्याबाबत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिलेल्या आदेशाचे तंतोतत पालन करण्यात येत असल्याचे शिक्षणाधिकारी सुलभा वठारे यांनी सांगितले.