भारीच की...; सोलापुरातील बचत गटाच्या हस्तकला वस्तूंची ब्राझीलला निर्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2021 10:55 AM2021-10-01T10:55:26+5:302021-10-01T10:55:33+5:30
वस्तू मिळाल्याने मानले आभार : पारंपरिक वस्तूच्या प्रेमात
सोलापूर : माढा तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंकृता स्वयंसाह्यता बचत गटाने तयार केलेल्या टेरिकोटा आर्ट (पारंपरिक हस्त कला) वस्तूंचे उत्पादन केले आहे. यातील काही वस्तू ब्राझील येथे पाठविण्यात आल्या आहेत. ब्राझीलने या बचत गटाचे पत्र लिहून आभार व्यक्त केले असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात उमेद मधील जिल्हा व तालुका स्तरावरील तालुका अभियान व्यवस्थापक व कर्मचारी यांची आढावा बैठक झाली. या बैठकीत मार्गदर्शन करताना सीईओ दिलीप स्वामी बोलत होते. याप्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा ग्रामीण विकास यंत्रणा विभागाचे प्रकल्प संचालक संतोष धोत्रे, उमेदच्या अभियान व्यवस्थापिका मीनाक्षी मडवळी, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, ग्रामीण विकास प्रकल्प विभागाचे प्रकल्प अधिकारी कुलकर्णी आदी उपस्थित होते.
पेण येथे या बचत गटाने पारंपरिक हस्त कलेचे शिक्षण घेतले आहे. त्यांनी तयार केलेल्या वस्तू या पारंपरिक आहेत. त्यामुळे ब्राझीलला त्याचे विशेष आकर्षण आहे. त्यामुळे येथील बचत गटांनी तयार केलेल्या हस्तकलेच्या वस्तूंना ब्राझीलमध्ये पसंती मिळत आहे. या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील बचत गटांसाठी तीन योजनांचा कृतिसंगम करा अशा सूचना सीईओ दिलीप स्वामी यांनी दिल्या.
जिल्ह्याच्या बचत गटांतील महिलांना स्वावलंबी करण्यासाठी यंत्रणेची प्रभावी अंमलबजावणी करा, बचत गटांची पुनर्बांधणी करा, बचत गटांना खेळते भांडवल उपलब्ध करून द्या, अशा सूचना सीईओ दिलीप स्वामी यांनी दिल्या.