सोलापूर शहरात पावसाची जोरदार बॅटिंग; झाडे उन्मळून पडल्याने वाहनांचे नुकसान
By Appasaheb.patil | Published: April 28, 2023 06:12 PM2023-04-28T18:12:04+5:302023-04-28T18:12:25+5:30
विजेच्या कडकडाट अन् वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला. अनेक भागात झाडे उन्मळून पडल्याने वाहनांचे नुकसान झाले आहे.
सोलापूर : सोलापूर शहरात शुक्रवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास अचानक पावसाला सुरूवात झाली. विजेच्या कडकडाट अन् वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला. अनेक भागात झाडे उन्मळून पडल्याने वाहनांचे नुकसान झाले आहे.
दरम्यान, हवामान खात्याने पाच दिवस पावसाचा अंदाज वर्तविला होता. कालपासूनच सोलापूर शहरासोबतच ग्रामीण भागातील वातावरणात बदल झाला होता. तापमानाचा पारा खाली उतरला होता. गुरुवारी रात्रीच्या सुमारास ग्रामीण भागात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. शुक्रवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. दुपारी मात्र थोड्या प्रमाणात उन्हाची तीव्रता जाणवली. दुपारनंतर हवामानात बदल झाला अन् ढग दाटून आले. सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास अचानक पावसाने सुरूवात केली अन् बघता बघता शहरातील सर्वच सखल भागात पाणीच पाणी झाले. डफरीन चौक, राघवेंद्र नगर, जुळे साेलापूर, पूर्व विभाग, बाळीवेस, निराळे वस्ती, जोडभावी पेठ, विजापूर वेस, विडी घरकुल आदी भागात झाडे उन्मळून पडल्याची माहिती आहे. अनेक ठिकाणी झाडे पडल्याने चारचाकी गाड्यांचे नुकसान झाले आहे. दुकानांचेही नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सायंकाळी सव्वा पाच वाजेपर्यंत पाऊस सुरूच होता. अनेक भागातील वीज गायब झाली होती.