धो धो पडला पाऊस,चार गावांचा संपर्क तुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:17 AM2021-07-11T04:17:06+5:302021-07-11T04:17:06+5:30
चपळगाव : पुनर्वसू नक्षत्राच्या पावसाने अक्कलकोट तालुक्यात चपळगाव मंडळात सलग चौथ्या दिवशी दमदार हजेरी लावली. हरणा नदीमुळे पितापूर, अकतनाळ, ...
चपळगाव : पुनर्वसू नक्षत्राच्या पावसाने अक्कलकोट तालुक्यात चपळगाव मंडळात सलग चौथ्या दिवशी दमदार हजेरी लावली. हरणा नदीमुळे पितापूर, अकतनाळ, तर ओढ्यामुळे डोंबरजवळगे, बऱ्हाणपूरचा संपर्क तुटला आहे. गेल्या आठवड्यापर्यंत खरीप पिकांसाठी पावसासाठी प्रार्थना करणाऱ्या शेतकऱ्याला मात्र हा पाऊस धोक्याची घंटा ठरला आहे. अक्कलकोट तालुक्याची वरदायिनी असलेल्या कुरनूर धरणातही पाणीसाठा वाढला आहे.
बोरी व हरणा या दोन नद्यांवर कुरनूर धरणाची मदार आहे. गेल्या चार दिवसांपासून पावसाने लाभक्षेत्रात दमदार हजेरी लावली. हरणा नदी प्रवाहित झाली आहे. बोरी नदीचा पाण्याचा प्रवाह कमी असला तरी असाच पाऊस राहिल्यास लवकरच कुरनूर धरण पूर्ण क्षमतेने भरेल. शनिवारी सकाळपर्यंत धरणात ३२ टक्के पाणी साठा झाला. यापूर्वी धरणात केवळ २० टक्के पाणीसाठा होता. तसेच डोंबरजवळगे परिसरात ढगफुटीसदृश स्थिती उद्भवली आहे. दोन दिवसांतील पावसामुळे डोंबरजवळगे-बऱ्हाणपूर मार्गावरील पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक खोळंबली होती. चपळगाव मंडळात जुलै महिन्यात १३० मिलि पाऊस अपेक्षित असताना ९ जुलैपर्यंत १६२ मिलि म्हणजे केवळ नऊ दिवसांत १२६ टक्के पाऊस पडला आहे.
---
उडदात थांबले पाणी
खरीप पिकांसाठी हा पाऊस आता धोक्याची घंटा ठरत आहे. अजूनही काही शेतकऱ्यांनी पेरणी केली नसून पडलेल्या पावसाने लवकर वाफसा होण्याची शक्यता नसून परिणामी शेतात तण वाढणार आहे. चपळगाव परिसरात अनेक ठिकाणी उडदाच्या पिकात पाणी साचले आहे. ही पिके वाढण्यापूर्वीच धोक्यात आली आहेत.
---
पितापूरकरांवर दुसऱ्या वर्षींही संकट...
दरम्यान, शुक्रवारी पडलेल्या पावसाने हरणा नदीच्या काठावरील पितापूर गावात पाणी शिरले. यामध्ये कित्येकांच्या घरात पाणी शिरल्याने धान्यासह संसारोपयोगी साहित्यांचे नुकसान झाले आहे. सलग दुसऱ्या वर्षी पितापूरकरांवर पावसाने संकट ओढावले आहे.
-----
१० चपळगाव १
हरणा नदी प्रवाहित झाली असून, दोन दिवसांतील पावसामुळे पाणी पातळी वाढली आहे.
१० चपळगाव २
चपळगाव शिवारात पावसामुळे उडदाच्या पिकात पाणी साचले आहे. उडदाबरोबरच इतर पिकेही पाण्याखाली गेली आहेत.
100721\img-20210710-wa0020.jpg
हरणा नदी प्रवाहित..