अक्कलकोट तालुक्यात मुसळधार पाऊस; गावागावात शिरले पाणी, अनेक गावांचा संपर्क तुटला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2022 04:32 PM2022-08-03T16:32:55+5:302022-08-03T16:32:55+5:30
नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला दिल्याची माहिती तहसिलदार बाळासाहेब शिरसाट यांनी दिली
आप्पासाहेब पाटील
सोलापूर : अक्कलकोट तालुक्यात बुधवारी दुपारच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली. या अचानक पडलेल्या मुसळधार पावसाने अनेक ओढे, तलाव, नाल्यांना पाणी आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. शिवाय अनेक गावात पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाल्याची माहिती देण्यात आली. दरम्यान, अक्कलकोट तालुक्यातील बोरगांव पुलावरून पाणी जोरात वाहू लागले आहे. बोरगांव-घोळसगांव चा संपर्क तुटला आहे. अक्कलकोट तालुक्यातील किणीवाडी पालापुर पुल पाण्याखाली गेला आहे. कुरनूर धरणातून सद्यस्थितीमध्ये ६०० क्युसेकने प्रवाह सोडण्यात आलेला आहे.
नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला दिल्याची माहिती तहसिलदार बाळासाहेब शिरसाट यांनी दिली. अक्कलकोट तालुक्यात सकाळपासूनच ढगाळ हवामान होते. शिवाय सोलापुरात दुपारनंतर पावसाच्या सरी कोसळल्या. अनेक भागात पाऊस पडत आहे. मागील काही दिवसांपूर्वी अक्कलकोट तालुक्यात मोठा पाऊस पडला होता. तेव्हाही अनेक गावांचा संपर्क तुटला होता. तहसिल प्रशासनाने नुकसानग्रस्त भाग व कुरनूर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. नागणसूर येथे चार ओढे आहेत. मुसळधार पावसात नागणसूर येथील चारही ओढे फुल भरून वाहू लागले. चारही ओढ्यांवरील पुलावरून पाणी वाहत राहिले. यापैकी भासगी ओढ्याच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक थांबली आणि नागणसूरचा संपर्क तुटला. सात तास गावचा संपर्क तुटला होता.
नागणसूर पुलाकडेचा भराव वाहून
अक्कलकोट-नागणसूर राष्ट्रीय महामार्गावर भासगी ओढ्याच्या पुलावर दिवसभर पाणी राहिल्याने भराव वाहवून गेला. त्यामुळे या पुलावर दोन ठिकाणी मोठे खड्डे पडून दोन ठिकाणी रस्ता खचला आहे. येथे धोकादायक स्थितीत वाहतूक सुरू असून, याची माहिती मिळताच बांधकाम विभागाचे अधिकारी आणि संबंधित ठेकेदाराने त्या ठिकाणी धाव घेऊन पाहणी केली. पाणी ओसरताच लवकरात लवकर पुन्हा भराव टाकून रस्ता दुरुस्त करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांनी ठेकेदाराला दिल्या.
कर्नाटकमध्ये धावणारी वाहने ठप्प
मार्गावरून अक्कलकोटहून धावणारी बरीच वाहने ही कर्नाटक राज्यात जातात. तीर्थक्षेत्र हैद्रा येथे ख्वाजा दर्गा असून, येथे अमावास्या, पौर्णिमा आणि विविध सण, उत्सवादरम्यान भाविकांची दर्शनासाठी याच पुलावरील रस्त्यावरून वर्दळ असते. तोळनूर, अक्कलकोट स्टेशन, कर्नाटकातील माशाळ, करजगी, अफझलपूर, उडचण, मनूर, शिंदगी, विजापूर अशा अनेक गावांना हा रस्ता जोडतो. येथून वाहतूक ठप्प झाली आहे. हा रस्ता धोकादायक बनला असून, रात्रीच्या वेळी एखादा वाहनस्वार, पादचारी या खड्ड्यात पडून दुर्घटना घडू शकते.