उजनी धरण परिसरात जोरदार पाऊस; दहा दिवसात पाच टक्के पाणीसाठा वाढला
By Appasaheb.patil | Published: June 11, 2024 01:32 PM2024-06-11T13:32:58+5:302024-06-11T13:35:38+5:30
सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उजनी धरण क्षेत्रात मागील आठवड्याभरापासून जोरदार पाऊस पडत आहे. या पावसामुळे दौंडमधून उजनीत विसर्ग सुरू झाला आहे.
सोलापूर : सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उजनी धरण क्षेत्रात मागील आठवड्याभरापासून जोरदार पाऊस पडत आहे. या पावसामुळे दौंडमधून उजनीत विसर्ग सुरू झाला आहे. मागील दहा दिवसात उजनीच्या पाणीपातळीत ५ टक्के वाढ झाल्याची माहिती उजनी धरण प्रशासनाने दिली.
सध्या दौंडमधून ४ हजार ८६७ क्युसेकचा विसर्ग उजनीत सुरू आहे. उजनीचा पाणीसाठा सध्याच्या घडीला मायनस ५५.८८ टक्के एवढा आहे. मागील आठवड्यात ही टक्केवारी मायनस ५९ टक्के एवढी होती. धरणाच्या पाण्याची पातळी ४९८.३२० मीटर एवढी आहे. धरण परिसरात ३/८८ मिमी एवढा पाऊस पडला आहे. सोमवारी दौंडमधील विसर्ग ७ हजार ९५४ एवढा होता, मात्र धरण परिसरात पावसाचा जोर कमी झाल्याने सध्या दौंडमधून ४ हजार ८६७ क्युसेकचा विसर्ग सुरू आहे.
सोलापूर जिल्ह्याच्या अनेक भागात चांगला पाऊस पडला आहे. उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, बार्शी, पंढरपूर, सांगोला आदी भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीलाच मृग नक्षत्राच्या दमदार पावसामुळे पहिल्यांदाच मान नदी दुथडी भरून वाहू लागली आहे.