विजेच्या कडकडाटासह सोलापूर शहर अन् परिसरात गावांमध्ये जोरदार पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 09:52 PM2020-06-10T21:52:59+5:302020-06-10T21:55:53+5:30
हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला; वादळी वाऱ्यामुळे वीजपुरवठा खंडित...!
सोलापूर : सोलापूर शहर व जिल्ह्यातमध्ये बुधवारी सायंकाळी साडेआठ वाजल्यापासून विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्याचा सुरू झालेल्या पावसामुळे गावातील वीजपुरवठा खंडित झाला होता. सोलापूर शहर, उत्तर सोलापूर, मोहोळ, अक्कलकोट, माढा, बार्शी आदी तालुक्यांमध्ये पावसाने हजेरी लावली.
नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) आगमनाला पोषक हवामान होत आहे. नैर्ऋत्येकडून येणारे वाऱ्यांचे प्रवाह मजबूत होत असल्याने कोकण, मध्य महाराष्ट्रात आज (ता.११) पाऊस जोर धरण्याची शक्यता सकाळीच वर्तवली होती. मागील दोन दिवसांपासून तापमानातही घट झाली होती.
दरम्यान, बुधवारी सकाळपासूनच उन्हाची तीव्रता अधिक जाणवत होती. दुपारनंतर वातावरणात थोडासा बदल झाला होता. सायंकाळी पाचच्या सुमारास सोलापूर शहर व परिसरात वादळी वारे वाहण्यास सुरुवात झाली होती. सकाळी आठच्या सुमारास आकाशात विजेचा कडकडाट सुरू झाला, साडेआठच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. रात्री दहा वाजेपर्यंत सोलापूर शहर व परिसरातील गावांमध्ये जोरदार पाऊस सुरूच होता.