साठ फूट उंचीवर मांजात अडकलेल्य़ा घारीची पक्षीमित्रांनी केली सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2021 12:10 PM2021-01-28T12:10:53+5:302021-01-28T12:11:00+5:30
सोलापूर लोकमत विशेष...
सोलापूर : श्री सिद्धेश्वर साखर कारखाना परिसरात निलगिरी झाडाच्या ६० फूट उंचीवर नायलॉन मांजात घार अडकली होती. सर्पमित्र अश्पाक मुच्छाले, वन्यजीवप्रेमी संस्था सदस्य, महानगरपालिका कर्मचारी व अग्निशमन दल सोलापूर यांच्या संयुक्त प्रयत्नाने घारीची सुटका करण्यात आली.
सर्पमित्र अश्पाक मुच्छाले यांना झाडावरील मांज्यात घार अडकल्याचे आढळून आले. त्यांनी याची माहिती समजताच वन्यजीव प्रेमी संस्थेला कळविले. काही वेळातच मुकुंद शेटे, प्रवीण जेऊरे, तेजस म्हेत्रे, संकेत माने, यश माढे, आदित्य मचाले हे घटनास्थळी पोहोचले. रोडलगत निलगिरीच्या झाडावर एक ब्राह्मणी घार उलट्या अवस्थेत अडकून पडलेली दिसली.
महानगरपालिका विद्युत विभागातील कदम यांना फोनवरून माहिती दिली. काही वेळात वाहनचालक देशमुख हे हायड्रोलिक बास्केट गाडी घेऊन पोहोचले. बास्केट गाडी क्रेन पूर्ण उभी केली असता घारीपर्यंत पोहोचण्यासाठी १५ ते २० फूट अंतर कमी पडत होते. सोलापूर अग्निशमन दलास फोन करून बांबू हूक मागविण्यात आले. अग्निशमन दल घटनास्थळी बांबू हूक घेऊन पोहोचले. त्यानंतर पुन्हा मोहीम सुरू झाली. बास्केट गाडीमध्ये प्रवीण जेऊरे व अग्निशमन दलाचे कर्मचारी बसले. त्यांनी हूक वापरून पतंगाचा मांज्या तोडताच ब्राह्मणी घार एका क्षणात आकाशात उडाली. हा क्षण पाहणाऱ्या नागरिकांनी टाळ्या वाजवून टीम सदस्यांचे कौतुक केले.