वधूला आणण्यासाठी पाठविले हेलिकॉप्टर, आख्या पंचक्रोशीत चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2019 09:46 PM2019-06-08T21:46:30+5:302019-06-08T21:46:51+5:30
ऐश्वर्या आणि नितीन यांचा उद्या लग्नसोहळा आहे.
सोलापूर : वधूपक्षाकडे लग्न असेल तर वराला आणण्यासाठी किंवा वर पक्षाकडे लग्न असल्यास वधूला आणण्यासाठी शिदोरी मुरळ्यासह वाहन पाठवतात. यामध्ये सर्वसामान्यपणे चारचाकी गाडी पाठविली जाते. मात्र, उपळाई बुद्रुक येथील वधूला आणण्यासाठी चक्क हेलिकॉप्टर पाठविण्यात आले. त्यामुळे येथील पंचक्रोशीत हा चर्चेचा विषय ठरला आहे.
उपळाई बुद्रुक येथील संत कुर्मदास सहकारी साखर कारखान्याचे संचालक शशिकांत उर्फ दीपकराव रामचंद्रराव देशमुख (इनामदार) यांची तृतीय कन्या ऐश्वर्या आणि कासेगाव तालुका पंढरपूर येथील नितीन यांचा उद्या लग्नसोहळा आहे.
दरम्यान, आज नितीन यांचे वडील प्रकाशराव आप्पासाहेब बाबर यांनी आपल्या सुनेला मान सन्मानाने मोठ्या जल्लोषात आणण्यासाठी हेलिकॉप्टर पाठवले होते. यावेळी नववधूला आणण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर पाहण्यासाठी ग्रामस्थांनी एकच गर्दी केली होती. तसेच, हा विषय आख्या पंचक्रोशीत चर्चेचा ठरला.