सोलापुरात हेल्मेट सक्ती ; साहेबऽऽ हेल्मेट घरी विसरलंय.. किमान आजचा दिवस माफ करा की ओ...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 03:43 PM2018-12-20T15:43:16+5:302018-12-20T15:45:36+5:30
सोलापूर : साहेब... हेल्मेट घरी राहिले आहे. मी विसरलो होतो..., यापुढे नक्की घालतो. साहेब हेल्मेटचे आॅनलाईन बुकिंग केले आहे, ...
सोलापूर : साहेब... हेल्मेट घरी राहिले आहे. मी विसरलो होतो..., यापुढे नक्की घालतो. साहेब हेल्मेटचे आॅनलाईन बुकिंग केले आहे, तीन दिवसात येईल मग घालतो अशी कारणे सांगत मोटरसायकलस्वार दंड न करण्याची विनंती करीत होते. शहर वाहतूक शाखा व आरटीओच्या संयुक्त मोहिमेंतर्गत दोन ठिकाणी ५४ जणांवर कारवाई करण्यात आली.
जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशावरून बुधवारपासून शहरात हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. हेल्मेट सक्तीसाठी सकाळी ११ ते २ या वेळेत सरस्वती चौक येथे शहर वाहतूक शाखेचे पोलीस व उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने कारवाईला सुरुवात करण्यात आली. एकामागे एक अशा मोटरसायकली पकडण्यास सुरुवात झाली. पोलिसांनी पहिल्यांदा हेल्मेट सक्ती झाली आहे. पेपरला वाचले नाही का?, हेल्मेट कुठे आहे? असा प्रश्न केला. साहेब हेल्मेट मिळाले नाही, शोधत आहे. उद्यापासून नक्की घालतो. अशी विनंती मोटरसायकलस्वार करीत होते. उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने एकूण १७ तर वाहतूक शाखेच्या वतीने एकूण १७ अशा ३४ कारवाया या परिसरात करण्यात आल्या.
सायंकाळी ५ वाजता सात रस्ता येथे कारवाईला सुरुवात झाली. एकूण २0 कारवाया करण्यात आल्या. दिवसभरात एकूण ५४ कारवाया झाल्या त्यात ३४ जणांविरुद्ध हेल्मेट न वापरल्याची कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई उपप्रादेशिक परिवहन विभागाचे सहायक मोटार निरीक्षक सागर पाटील, सहायक मोटार निरीक्षक उदयसिंह साळुंके व अन्य कर्मचारी, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक कमलाकर पाटील, सहायक पोलीस निरीक्षक विजयानंद पाटील, फौजदार संजय खैरे आदी ८ पोलीस कर्मचाºयांनी पार पाडली.
कारवाई दिसताच अनेकांनी ठोकली धूम...
- - सरस्वती चौकात सुरू असलेली कारवाई पाहून अनेक मोटरसायकलस्वार गाडी वळवून निघून जात होते. कारवाई कशाची सुरू आहे याचा प्रश्न जाणाºया-येणाºया लोकांना पडला होता.
- - हेल्मेट नसल्यास उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने ५00 रुपयांचा दंड आकारला जात होता. दंड भरण्यासाठी पैसे नसल्यास त्यांना ५00 रुपयांच्या दंडाचा मेमो दिला जात होता.
- - दंड केल्यानंतर अधिकारी संबंधित वाहनचालकांना यायुढे हेल्मेट वापरण्याचा सल्ला देत होते.
जिल्हाधिकारी यांच्या आदेशावरून हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. हेल्मेट हा लोकांच्या सुरक्षिततेसाठी फायदेशीर आहे. दुचाकी मोटरसायकलस्वारांनी नियमाचे पालन करावे. हेल्मेट वापरून स्वत:ची काळजी घ्यावी.
- विजयानंद पाटील
सहायक पोलीस निरीक्षक,
वाहतूक शाखा