हिंदू महिलेच्या नेत्रशस्त्रक्रियेसाठी रमजानच्या पवित्र महिन्यात मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 08:30 PM2019-06-14T20:30:33+5:302019-06-14T20:32:23+5:30
मुस्लीम बांधवांची माणुसकी; उपचारासाठी १५ हजारांचा केला खर्च
अकलूज : अल्लाह का हुक्म है की रमजान मे अल्लाह के बंदे ने नेक काम करना चाहिये, गरीब और भूखा किस मजहब का है? उनकी जाती कौनसी है, यह मायने नही रखता। हाच आदर्श घेऊन अकलूज मुस्लीम समाजातर्फे रमजानच्या पवित्र महिन्यात हिंदू महिलेला डोळ्यांच्या शस्त्रक्रियेद्वारे दृष्टी प्राप्त करून देत मानवधर्म पाळला.
अकलूज येथील अनुपम आय क्लिनिकमध्ये आलेल्या मंगल सूळ या हिंदू महिलेकडे डोळ्यांच्या उपचारासाठी पैसे नव्हते. रमजानच्या पवित्र महिन्यात अकलूजच्या मुस्लीम समाजाने पवित्र असे सामाजिक कार्य करण्याचा निर्णय घेतला. यावर केवळ आश्वासन न देता मंगल सूळ यांच्या डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी आलेले हॉस्पिटल बिल भरून त्या महिलेला मदत करून समाजापुढे एक नवीन आदर्श ठेवला आहे.
मुस्लीम समाज, सुनील लावंड व मकानदार यांचे त्यांनी अभिनंदन केले. मंगल सूळ यांच्या दोन्ही डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी सुमारे १५ हजार रुपये खर्चाची रक्कम मुस्लीम बांधवांनी देऊ करीत हिंदू महिलेला दृष्टी प्राप्त करून दिली आहे.
मार्गदर्शक तत्त्वांचा अंगीकार करावा : शिवतेजसिंह
- मुस्लीम समाज हा कुराण शरीफच्या आदर्शावर चालत असतो. यामध्ये जकात हा असा एक शब्द आहे जो आपल्या नेक कमाईतील ठराविक हिस्सा खैरात म्हणून गरिबांमध्ये वाटतात. तसेच शेजारी कोणी उपाशी झोपले नाही ना, याची खात्री करून मगच जेवतात. अशा अनेक मार्गदर्शक तत्त्वांचा अंगीकार करायचा असतो, असे सरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.