सोलापूर बाजार समितीत काँग्रेस नेत्यांना मदत केली; आता त्यांनी भाजपला सहकार्य केले पाहिजे : पालकमंत्र्यांचा निरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 10:48 AM2019-03-19T10:48:22+5:302019-03-19T10:49:43+5:30
सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघातून भाजपतर्फे डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांची उमेदवारी निश्चित झाल्याचे स्पष्ट करून पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी ...
सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघातून भाजपतर्फे डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांची उमेदवारी निश्चित झाल्याचे स्पष्ट करून पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी भाजपासोबतच विरोधी गोटातील नेत्यांची जुळवाजुळव सुरू केली आहे. बाजार समितीच्या निवडणुकीत मी काँग्रेसच्या नेत्यांना सहकार्य केले होते. आता त्या नेत्यांना महास्वामींचे काम करायला सांगा, असा निरोप देशमुखांनी काँग्रेसच्या काही नेत्यांना पाठविल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.
भाजपाची उमेदवार यादी लवकरच जाहीर होणार आहे. सोलापूरची जबाबदारी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यावर सोपविण्यात आली आहे. देशमुखांनी सकाळी शहरातील व्यापारी, काँग्रेस गोटातील नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. यामध्ये दक्षिण सोलापूर तालुक्यातील काही काँग्रेस नेत्यांचा समावेश होता. डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामींच्या उमेदवारीला हिरवा कंदील मिळाला आहे.
शहरातील लिंगायत समाजाच्या नेत्यांनी एकत्र यावे आणि महाराजांचे काम करावे, असेही त्यांनी अनेक नेत्यांना सांगितले आहे. यातील लोकांनी सहकार्य करण्याची तयारी दाखविली आहे तर काहींनी स्पष्टपणे नकार दिला आहे. बाजार समितीच्या निवडणुकीत पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी काँग्रेस आघाडीतून निवडणूक लढविली होती. आता या आघाडीतील काही नेत्यांनी भाजपला मदत करावी, असा प्रयत्न देशमुखांकडून सुरू आहे.
निवडणुकीच्या तयारीसाठी भाजपा आणि शिवसेना नगरसेवक, पदाधिकाºयांचा संयुक्त मेळावा पुण्यामध्ये आयोजित करण्यात आला होता; मात्र गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे निधन झाल्याने हा मेळावा रद्द झाला. या मेळाव्यानंतर पालकमंत्री देशमुख यांच्याकडून सोलापुरातील संयुक्त बैठकीची तारीख निश्चित होणार होती. महापालिकेतील विषय समिती वाटपाचा विषय निकाली निघाला नसल्याने शिवसेनेचे नगरसेवक नाराजी व्यक्त करीत असल्याचे दिसून येत आहे.
धवलसिंहांनी घेतली पालकमंत्र्यांची भेट
- माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीबाबत भाजपामध्ये खलबते सुरू आहेत. भाजपा पुरस्कृत महाआघाडीचे नेते तथा जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे यांनी भाजपाची उमेदवारी स्वीकारण्यास नकार दिला आहे. दुसरीकडे राष्टÑवादीचे माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांचा भाजपा प्रवेश निश्चित झाल्याचेही संंकेत मिळाले आहेत. त्यातच रणजितसिंह यांचे अकलूजमधील विरोधक धवलसिंह मोहिते-पाटील यांनी सोमवारी सायंकाळी सोलापुरात पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांची भेट घेतली. या भेटीत धवलसिंहांनी भाजपा प्रवेशाची इच्छा बोलून दाखविल्याची चर्चा आहे.