दिव्यांग नयनाला बच्चू कडूंच्या मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:16 AM2021-07-16T04:16:50+5:302021-07-16T04:16:50+5:30
सोलापूर : माढा तालुक्यात मानेगाव येथे राहणारी नयना नागनाथ जोकार (वय१७) ही मुलगी अस्थिव्यंग असून तिच्या घरची परिस्थिती हलाकीची ...
सोलापूर : माढा तालुक्यात मानेगाव येथे राहणारी नयना नागनाथ जोकार (वय१७) ही मुलगी अस्थिव्यंग असून तिच्या घरची परिस्थिती हलाकीची आहे. नयनाची उंची दीड फुटापेक्षाही कमी असल्यामुळे तिला स्वत:हून काहीच करता येत नाही. त्यामुळे तिची आई संपूर्ण वेळ तिची देखभाल करते. वडील मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात.
सोमवारी १२ जुलै रोजी राज्यमंत्री बच्चू कडू यांना मोबाईलद्वारे नयना जोकार हिने संपर्क साधला. आपल्याला राहायला घर नसून अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांपासून वंचित असल्याची माहिती दिली. या संभाषणाची चित्रफीत सोशल-मीडियाद्वारे राज्यभर फिरली. सोलापूर जिल्हा प्रहार संघटनेकडून तातडीची पावले उचलली गेली. मानेगाव येथील तिच्या अर्धवट उभारणी केलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये प्रहार संघटनेचे पदाधिकारी अमोल जगदाळे, शंभुराजे खलाटे, संजीवनी बारंगुळे, दत्तात्रय व्यवहारे, जिल्हा संघटक विठ्ठल मस्के, संजय जगताप, विजय चव्हाण, दत्ता चौगुले, गणेश ननवरे, ज्ञानेश्वर गायकवाड, बसवराज शेगावकर, बापू राऊत, उमेश मखरे-इंदापूर, सतीश बारंगुळे, नानासाहेब लोंढे-इंदापूर यांनी घर बांधण्यासाठी रोख स्वरूपात आर्थिक मदत केली. संजीवनी बारंगुळे यांनी अन्नधान्य व कपड्यांना पैसे देऊन सहकार्य केले.
यावेळी मानेगावचे सरपंच तानाजी लांडगे यांनी दिव्यांग नयना जोकारला ग्रामपंचायत स्तरावरून दिव्यांग घरकुल योजनेच्या माध्यमातून कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करून पक्के घर देण्याची ग्वाही दिली.
------
फोटो : १५ नयना
दिव्यांग नयना जोकार हिला पत्र्याचा निवारा लाभून देताना सरपंच तानाजी लांडगे, नयनाचे कुटुंब आणि प्रहार संघटनेचे कार्यकर्ते.