हेल्पलाईनवर विचारणा होते ती व्हॅक्सिनची; आता रुग्णही घटले अन् कॉलही झाले कमी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 02:17 PM2021-06-24T14:17:46+5:302021-06-24T14:17:56+5:30
सोलापुरातील कोरोना वॉर रूम : आता युवक-युवती सल्ला घेऊनच घेतात लस
सोलापूर : कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोना रुग्णांना बेड उपलब्ध करणे, विलगीकरण, क्वारंटाईन सेंटर यासाठी पॉझिटिव्ह रुग्णांना डॉक्टरांचे मार्गदर्शन मिळावे यासाठी जिल्हा प्रशासन व महापालिकेतर्फे कोरोना वॉर रूम सुरू करण्यात आली. येथील हेल्पलाईनवर एप्रिल महिन्यात कॉल्सचे प्रमाण प्रचंड वाढले होते. जून महिन्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरताच बेड उपलब्धतेबाबत येणारे कॉल जवळपास बंद झाले आहेत. आता व्हॅक्सिनेशनसाठी कॉल येत आहेत. यात प्रामुख्याने १८ वर्षांवरील युवकांचा समावेश आहे.
एप्रिल महिन्यात कोरोना संक्रमणाचा प्रकोप सुरू असताना हेल्पलाईनवरील कर्मचाऱ्यांना सतत कॉल येत होते. मात्र, जून महिना सुरू होताच रुग्णांची संख्या कमी झाल्याने मागील दोन आठवड्यांत हेल्पलाईनवर येणारे कॉल कमी झाले आहेत. मात्र, लसीकरणाबाबत विचारणा होत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
आम्हाला लस कधी मिळणार?
१८ वर्षांवरील सर्वांना कोरोना लस देण्याची घोषणा करण्यात आली. परंतु, लसीचा पुरेसा साठा उपलब्ध होत नसल्याने ३० वर्षांवरील नागरिकांना काही केंद्रांवर लसीचे डोस दिले जात होते. शासनाने घोषणा केल्याने १८ वर्षांवरील युवक लसीसाठी हेल्पलाईनवर कॉल करून विचारणा करत आहेत. आम्हाला लस कधी मिळणार, यासाठी ऑनलाईन नोंदणी कशी करायची, कुठली लस उपलब्ध आहे, कोव्हॅक्सिन चांगली की कोविशिल्ड, अशी विचारणा करतात.
-----
मेडिक्लेम लागू होईल का?
- कोरोनाचे रुग्ण वाढत असताना बेडची विचारणा होत होती. रेमडेसिविर इंजेक्शनसाठी अनेक जणांनी फोन केले.
- रुग्णालय व क्वारंटाईन सेंटरमधील जेवण, स्वच्छता, डॉक्टरांचे राऊंड याबाबत तक्रारी हेल्पलाईनवर येत होत्या.
- रुग्णाला मेडिक्लेम लागू करण्यासाठी अडचणींबाबत अधिक विचारणा झाली. प्रक्रिया जाणून घेण्यासाठी कॉल करण्यात आले.
नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून हेल्पलाईनची सुरुवात करण्यात आली. त्याचा शहर व जिल्ह्यातील अनेक नागरिकांना फायदा झाला. अनेकांपर्यंत पोहोचून मदत करण्यासाठी हेल्पलाईनची मदत झाली.
- भारत वाघमारे, निवासी उपजिल्हाधिकारी.
------
तारीख कॉल
- १ मे ३००
- १५ मे २६४
- १ जून १३५
- १५ जून ३०
- २० जून १६