शासनाच्या परवानगीनंतरच सोलापुरातील हाेम मैदान मंदीर समितीच्या ताब्यात देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2021 07:28 PM2021-12-17T19:28:03+5:302021-12-17T19:28:10+5:30
आयुक्त पी. शिवशंकर : नंदीध्वज मार्ग दुरुस्तीसाठी दिले निवेदन
साेलापूर : ओमायक्राॅनच्या धर्तीवर ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराज यांच्या यात्रेला परवानगी द्यायची की नाही याबद्दल शासनाकडे मार्गदर्शन मागविले आहे. शासनाकडून निर्देश आल्यानंतर हाेम मैदान यात्रा कमिटीच्या ताब्यात देणे आणि इतर विषयांवर कार्यवाही हाेईल, असे महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी गुरुवारी ‘लाेकमत’ला सांगितले.
गड्डा यात्रेसाठी हाेम मैदान ताब्यात द्यावे असे पत्र सिद्धेश्वर देवस्थान यात्रा समितीचे चेअरमन भीमाशंकर पटणे, ॲड. बाळासाहेब भाेगडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी अतिरिक्त आयुक्त विजय खाेराटे यांना दिले. यंदाच्या यात्रेच्या कामकाजास १५ डिसेंबरपासून सुरुवात झाली आहे. हाेम मैदान येथे यात्रेतील काही धार्मिक विधी पार पडतात. करमणुकीची साधने, कृषी प्रदर्शन यासह विविध दुकाने असतात. यंदा मैदानावर माेठे साहित्य पडले आहे. मैदानावर गवत वाढले आहे. अशा परिस्थितीत यात्रा भरविणे अडचणीचे हाेणार आहे. हे साहित्य अन्यत्र हलवून मैदान स्वच्छ करावे, अशी मागणी पटणे यांनी केली.
दरम्यान, आयुक्त पी. शिवशंकर म्हणाले, ओमायक्राॅनचा धाेका पाहता शासनाकडून यात्रेसंदर्भात मार्गदर्शन आवश्यक आहे. शहरातील काेराेना नियंत्रणात आहे. यासंदर्भातील अहवालासह प्रस्ताव शासनाकडे पाठविणार आहाेत. शासनाचे मार्गदर्शन येताच कार्यवाही सुरू हाेईल.
---
नंदीध्वज मिरवणूक मार्ग दुरुस्त करा
१२ ते १५ जानेवारी या कालावधीत सिद्धेश्वरामेश्वरांनी स्थापन केलेल्या ६८ लिंगाच्या प्रदक्षिणेसाठी व इतर धार्मिक विधिकरीता मिरवणुका निघतात. या मिरवणूक मार्गावर सध्या खड्डे पडले आहेत. शिवाय या मार्गावर स्मार्ट सिटी अंतर्गत रस्त्याची कामे सुरू आहेत. ही कामे अर्धवट आहेत. यात्रेपूर्वी ही कामे त्वरीत पूर्ण करावीत, अशी मागणी यात्रा समितीने केली.
--
मिरवणूक मार्गावरील कामे पूर्ण करण्याचे आदेश नगरअभियंता संदीप कारंजे आणि सहकाऱ्यांना दिले आहेत. डिसेंबरअखेर सर्व काम पूर्ण हाेतील. लवकरच एक आढावा बैठक घेण्यात येईल.
- विजय खाेराटे, अतिरिक्त आयुक्त, मनपा.