चारित्र्य संशयावरुन पती सतत मारहाण करायचा; बहिणीच्या मुलाच्या मदतीने खून केल्याची कबुली
By काशिनाथ वाघमारे | Published: October 20, 2023 06:56 PM2023-10-20T18:56:24+5:302023-10-20T18:56:32+5:30
कंटाळलेल्या पत्नीने बहिणीच्या मुलाच्या मदतीने साडीने गळा आवळून खून केल्याची कबुली पंढरपूर पोलिसांपुढे दिली आहे.
सोलापूर : हातपाय बांधून पोत्यात भरुन भीमा नदीपात्रात टाकून दिलेल्या मृतदेहाची ओळख पाेलीसांनी काही तासातच पटवली. या प्रकरणात पत्नीनेच पतीचा खून केल्याचे उघड झाले आहे. पती दारु पिऊन चारित्र्याचा संशय घेऊन सतत मारहाण करीत होता. कंटाळलेल्या पत्नीने बहिणीच्या मुलाच्या मदतीने साडीने गळा आवळून खून केल्याची कबुली पंढरपूर पोलिसांपुढे दिली आहे.
गुरसाळे (ता. पंढरपूर) येथील भीमा नदीच्या पात्रात तरुणाचा मृतदेह एका पोत्यात हात पाय बांधून फेकण्यात आला होता. त्याच्या डाव्या हाताच्या पोटरीवर मराठीत 'शीतल' व उजव्या हाताचे पोटरीवर मराठीत 'आश्विनी' व बदाम आकारामध्ये 'माँ ' असे गोंदलेले आढळले.
उपविभागीय पोलीस अधीक्षक अजुर्न भोसले, पोलीस निरीक्षक मिलिंद पाटील यांनी घटना स्थळी धाव घेतली. पाहणीत पोलिसांनी हा खून असल्याचा अंदाज व्यक्त केला. यावेळी त्यांना त्या मृताच्या खिश्यात एक चिठ्ठी मिळाली. त्यात त्यांचे नाव, पत्ता आढळले.
या चिठ्ठीच्या मदतीने पोलिसांनी त्याची पत्नी शीतल संदीप माने (वय २८, रा. बेंद वस्ती, कासेगाव, ता. पंढरपूर) हिला पोलिस ठाण्यात बोलावले. चौकशीत तिच्या बोलण्यातून संशय आला. मद्यपान करुन चारित्र्याच्या संशयावरुन मारहाण करीत होता. कंटाळून तिने तिच्या बहीणीचा मुलगा मंगेश आंबदास माने (वय २२, रा. बेंद वस्ती, कासेगाव, ता. पंढरपूर) याच्या मदतीने त्याचा खून केल्याचे सांगितले.
खिश्यातील चिठ्ठीने दिली दिशा...
मयत संदीप व त्याची पत्नी मोबाईल वापरत नव्हते. यामुळे त्यांच्या संपर्कात कोण होते हे शोधणे कठीण होते. मात्र संदीच्या खिश्यात एक चिठ्ठी आढळली. या चिठ्ठीवर मोबाईल नंबर होता.