इथे हनुमानही विठ्ठलाच्या रूपात उभा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2019 12:51 PM2019-07-09T12:51:16+5:302019-07-09T12:56:25+5:30
पंढरपुरातील चंद्रभागा घाट; होळकर वाड्यातील मूर्ती वारकºयांसाठी श्रद्धेची
राकेश कदम
सोलापूर : पंढरपूरच्या रोमारोमात आणि कणाकणात लाडका विठुराया आहे. परंतु, येथील इतर देव-देवतांनाही मूर्तीकारांनी विठ्ठलाचे रुप दिले आहे. चंद्रभागा घाटावरील होळकर वाड्यात एक हनुमानाची मूर्ती असून, ही मूर्तीही विठ्ठलाच्या रुपात प्रभू रामचंद्रासमोर हात जोडून उभी आहे.
चंद्रभागा घाटावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर संस्थानचा होळकर वाडा आहे. अहिल्यादेवी होळकर यांनी १७६८ मध्ये हा वाडा बांधून घेतला आहे. या वाड्यात राम, लक्ष्मण, सीतामाई आणि भक्त हनुमानाचे मंदिर आहे. या मूर्तींबद्दल कथाही सुरस आहे. या मंदिराचे पुजारी चंद्रकांत दंडवते म्हणाले, अहिल्यादेवी होळकर यांनी देशभरात शिवमंदिरे बांधली. पंढरपुरात होळकर वाड्यासाठी पाया खोदताना येथे हनुमानाची मूर्ती सापडली. ही मूर्ती सापडली म्हणून या वाड्यात राममंदिर बांधण्यात आले. अन्यथा इतर वाड्यांमध्ये शिवमंदिरे बांधण्यात आलेली आहेत.
खोदकामात सापडलेली हनुमानाची मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण आहे. डोक्यावर विठ्ठलासारखाच टोप आहे. कानाच्या बाजूला दोन मत्स्य आहेत. अनेक ठिकाणी हनुमान मूर्ती आहेत. पण मत्स्य आकार असलेली ही दुर्मिळ मूर्ती आहे. विठ्ठलाच्या रुपात हनुमान उभा आहे. विठ्ठलाच्या गळ्यात जशी माळ दिसते तशीच हनुमानाच्या गळ्यात माळ आहे. हनुमान भक्तांना एकाच वेळी विठ्ठलाचे आणि हनुमानाचे दर्शन घडते. अनेक मूर्ती अभ्यासकांना या मूर्तीचे अप्रूप आहे. विदर्भ, मराठवाडा, कोकण भागातून येणारे वारकरी होळकर वाड्यात मुक्कामाला असतात. विठुरायाचे दर्शन घेतल्यानंतर वाड्यातील हनुमानाचे दर्शन घ्यायला ते विसरत नाहीत. देवाची भेट घेतल्यानंतर रामभक्ताची भेट घेतल्याचा आनंद या वारकºयांना मिळतो, असेही दंडवते यांनी सांगितले.