सोलापुरातील शहरातील हेरिटेज विहिरी भग्नावशेषाच्या गाळात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 01:15 PM2018-11-24T13:15:39+5:302018-11-24T13:18:10+5:30
रेवणसिद्ध जवळेकर सोलापूर : यंदा झालेला अत्यल्प पाऊस... अजून हिवाळ्याचा हंगाम जायच्या आधीच निर्माण होत असलेल्या पाणीटंचाईचे संकट... ऐन ...
रेवणसिद्ध जवळेकर
सोलापूर : यंदा झालेला अत्यल्प पाऊस... अजून हिवाळ्याचा हंगाम जायच्या आधीच निर्माण होत असलेल्या पाणीटंचाईचे संकट... ऐन उन्हाळ्यात या संकटावर मात करण्यासाठी असलेल्या विहिरींचा पुरेपूर वापर करुन घेण्यासाठी उपाययोजना होत नाहीत. याविषयी मंगळवारी ‘लोकमत’ चमूने आॅन दी स्पॉट रिपोर्टिंग केल्यावर या विहिरींना ‘फिश टँक’चे स्वरूप आल्याचे नजरेत भरले. या हेरिटेज विहिरी भग्नावशेषाच्या गाळात अडकल्या आहेत.
८ आॅगस्ट १९९२ रोजी सोलापूर शहराची हद्दवाढ झाली. शहरालगतची मजरेवाडी, सोरेगाव, देगाव, बसवेश्वरनगर, केगाव, बाळे, शेळगी आदी गावे शहरात समाविष्ट झाली. हद्दवाढ भागातील या गावांमध्ये कुठे एक तर कुठे दोन विहिरी आढळून आल्या.
दुपारी १२ वाजून ५ मिनिटांनी चमू होटगी रोडवरील हत्तुरे वस्तीत (मजरेवाडी) पोहोचला. तेथील भल्यामोठ्या विहिरीत भरपूर पाणी दिसले; मात्र कचरा साचल्याने पाणीच दिसत नव्हते. तेथील एका रहिवाशाला बोलते केले असता त्याने ‘केवळ गणेशोत्सवात मूर्तींचे विसर्जन करण्यापुरतीच ही विहीर आहे’ असे सांगितले.
तेथून हाकेच्या अंतरावर मजरेवाडी गावातील (कुत्रवाडी) विहिरीनेही आमचे लक्ष वेधून घेतले. येथे काही महिला धुणी धुवत होत्या. महापालिकेने विहिरीवर फिल्टर यंत्रणा बसवली तर उन्हाळ्यात त्या पाण्याचा चांगला उपयोग होत असल्याची प्रतिक्रिया ताकमोगे वस्तीतील बाळासाहेब ताकमोगे यांच्याकडून ऐकावयास मिळाली. होटगी रोडवरीलच कोळगिरी नगरातील जुनी विहीरही शेवटची घटिका मोजत आहे.
दुपारी साडेबारा वाजता रेल्वे लाईन परिसरातील पंखा बावडी (विहीर) येथे चमू दाखल झाला. ब्रिटिश काळातील या विहिरीची बांधणी (बांधकाम) आजही मजबूत असल्याचे दिसून आले. त्यावेळी विहिरीतील पाण्याचा उपसा करताना पंख्याचा वापर होत होता. त्यामुळे पंखा विहीर म्हणून ती प्रसिद्ध आहे. सभोवताली वाढलेले गवत अन् आत पडलेल्या कचºयामुळे ही विहीर आता नावालाच राहिली आहे. चौकोनी आकारात असलेल्या याच विहिरीलगत दुसरी गोल विहीरही त्याच अवस्थेत असल्याचे आमच्या नजरेत भरले.
दुपारी अडीच ते पावणेतीन दरम्यान केलेल्या आॅन दी स्पॉट रिपोर्टिंगवेळी अनेक विहिरी बुजलेल्या दिसल्या. आत्महत्येचे घडलेले प्रकार पाहता या विहिरी बुजविण्यात आल्याचे काहींनी सांगितले.
गंगा विहिरीतील ‘गंगा’ घरापर्यंत
- दुपारी १ वाजून १० मिनिटांनी नवीपेठेतील गंगा विहिरीजवळ आलो. विहिरीला कुठेही धक्का न बसता त्यावर बांधकाम झाल्याचे दिसले. अगदी ५ बाय ५ फूट जागेत त्या विहिरीतील आजही पाणी उपसा केले जाते. महापालिकेच्या ताब्यातील या एकमेव विहिरीतील सांडपाण्याचा उपयोग नवीपेठ, चौपाड, काळी मस्जिद, पत्रा तालीम आदी भागातील नागरिकांसाठी होत असल्याचे तेथील विक्रेते मिथुन यादव यांच्याकडून समजले.
किरीटेश्वर मठातील विहिरीतील गाळ स्वखर्चाने काढला !
- दुपारी दीड वाजता चमू कुंभारवेस येथील श्री किरीटेश्वर मठात पोहोचला. या मठाच्या परिसरात दोन विहिरी पाहावयास मिळाल्या. त्यापैकी एक विहीर मठ संस्थानच्या वापरात आहे. अन्य कामासाठी या विहिरीतील पाण्याचा वापर होतो. मठाधिपती म. नि. प्र. स्वामीनाथ स्वामी यांच्या पाणीचळवळीचा उद्देशही समजला. याच मठातील दुसरी विहीर आज जी जिवंत आहे, ती केवळ तेथील जागरुक युवकांमुळेच. या भागातील रासपचे शहराध्यक्ष अशोक कोळेकर हे भेटले. दीड-दोन वर्षांपूर्वी युवकांनी लोकवर्गणीतून जमा झालेल्या १२ हजार रुपयांमध्ये विहिरीतील गाळ काढल्याचे त्यांनी सांगितले.
विहिरी अधिग्रहण योजना रखडली
- काही वर्षांपूर्वी महापालिकेने ८ विहिरी अधिग्रहण करण्याचा विचार करुन त्यावर फिल्टर यंत्रणा बसविण्याचा प्रस्ताव केला होता. कामाची निविदाही निघाली. एका ठेकेदाराला हे कामही देण्यात आले. मात्र ‘कुठे माशी शिंकली कुणास ठाऊक’ ठेकेदाराकडून हे कामही पूर्ण झाले नाही. त्यानंतर महापालिकेने आजतागायत विहिरींकडे दुर्लक्ष केल्याचे एकाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.
केवळ १३ विहिरींचीच नोंद
- महापालिकेच्या ताब्यात असलेल्या ८ विहिरी तर खासगी मालकांच्या ५ विहिरींचीच नोंद आहे. सुभाष उद्यान, साखरपेठ शॉपिंग सेंटर, रुपाभवानी मंदिर, दमाणीनगर, विडी घरकूल (एबी ग्रुप), रेवणसिद्धेश्वर मंदिराच्या मागे, देगाव आणि जयभवानी उद्यान येथील विहिरी महापालिकेच्या तर लक्ष्मी विष्णू चाळ, पारसी अग्यारी (लष्कर), मौलाली बावडी (फॉरेस्ट), धोत्रीकर वस्ती आणि अन्य एका ठिकाणची विहीर या विहिरी खासगी मालकांच्या आहेत.
आम्ही युवा कार्यकर्त्यांनी वर्गणी गोळा करुन किरीटेश्वर मठात असलेल्या विहिरीतील गाळ काढला. सांडपाण्यासाठी का होईना ही विहीर आमच्यासाठी उपयुक्त अशीच आहे. महापालिकेने सर्वच विहिरीतील गाळ काढून पाण्याचा पुनर्वापर करावा, अशी अपेक्षा आहे.
-अशोक कोळेकर, अध्यक्ष- रासप.