अरे बाप रे...; घर अन् दुचाकी-चारचाकी आहे; अशानाही हवे योजनेतील घरकूल !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2021 06:39 PM2021-08-10T18:39:20+5:302021-08-10T18:39:27+5:30
पंतप्रधान आवास योजना: ३९ हजार जणांचे फेटाळले अर्ज
सोलापूर : घर, गाडी असणाऱ्यांनाही आणखी एक स्वतंत्र नवे घर हवे आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकूल योजनेसाठी अर्ज केलेल्या ३९ हजार ६४६ जणांचे अर्ज या कारणाने फेटाळण्यात आले आहेत.
जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत पंतप्रधान घरकूल आवास याेजना राबविण्यासाठी २०११ मध्ये सर्वेक्षण करण्यात आले. यावेळी ६० हजार जणांना घरकूल हवे असल्याची यादी करण्यात आली. छाननीत, पहिले घर असताना दुसऱ्या घराची मागणी, मयत, वारस नसलेले ९ हजार ९२६ अर्ज फेटाळण्यात आले. ५० हजार ७४ अर्जाला मंजुरी देण्यात आली. यातही ७ हजार ७२ जणांना जागा नाही. स्थलांतरित झालेली ४ हजार नावे पुन्हा वगळण्यात आली. छाननीत ३६ हजार लाभार्थींना घरकूल मंजूर झाले. त्यानतंर २०१६ मध्ये पुन्हा घरकूलसाठी सर्वेक्षण झाले.
यावेळी मात्र २ लाख ७ हजार ४८६ जणांनी अर्ज केले. १३ निकष लावून या अर्जाची छाननी करण्यात आली. यामध्ये पहिले घर असणे, दुचाकी, कार, उत्पन्न, स्वत:च्या नावे शेत, घरात फ्रीज, वॉशिंग मशीन असणाऱ्यांनी अर्ज केला होता. अशी ३९ हजार ६४६ नावे वगळण्यात आली. आता यातील १ लाख ६७ हजार ८४० जणांना घरकुल योजना मंजूर करण्यात आली आहे.
पात्र अर्जदारांचे जॉबकार्ड मॅपिंग
घरकूल योजनेत नाव आलेल्यांना घर बांधण्यासाठी १ लाख २० हजारांचे अनुदान दिले जाते. त्याचबराेबर लाभार्थींला रोजगार व इतर सुविधा दिल्या जातात. पहिल्यावेळी रोजगार हमीचे काम ऐच्छिक होते. पण आता नव्याने लाभ देताना कुटुंबाला मनरेगाचा लाभ दिला जातो. यासाठी अर्जदारांचे जॉबकार्ड तयार केले जाते. २१ दिवसांत त्याचे चार मस्टर निघतात. लाभार्थी घरकूल योजनेच्या घर बांधणीच्या कामावर हजेरी लावू शकतो किंवा इतर मजुरांच्या मदतीने हे बांधकाम पूर्ण करता येते. जॉबकार्डची ग्रामपंचायतीच्या मस्टरला नोंद केली जाते.
जिल्ह्यात आलेले एकूण अर्ज - २०७४८६
गाडी, बंगला नावावर असताना आलेले अर्ज - ३९६४६
आतापर्यंत किती जणांना मिळाले घरकूल - ३६२५६
जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात ३६ हजार २५६ घरकुलांना मंजुरी दिली. त्यातील २१ हजार ६१८ घरकूल पूर्ण झाली आहेत. उर्वरित घरांचा पहिला हप्ता वितरित करण्यात आला असून, बांधकाम प्रगतिपथावर आहेत. सर्वेक्षणात गाडी, बंगला नावावर असलेल्यांचे अर्ज फेटाळण्यात आले आहेत. यासाठी १३ निकष लावण्यात आले होते.
डॉ. अर्जुन गुंडे, प्रकल्प संचालक