अरे बाप रे... झोपेत घोरल्यामुळे वजन वाढतं अन् मधुमेह, हदयविकाराच्या धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2021 11:57 AM2021-10-08T11:57:09+5:302021-10-08T11:57:15+5:30
मधुमेह, हृदयविकाराचा धोका : शरीरात होतात बदल
सोलापूर : अलीकडे झोपेत घोरणाऱ्यांची संख्या वाढत आहे. अनेकदा घोरणाऱ्यांना आपण घोरतोय हे ठाऊकही नसते. झोपेत घोरण्याच्या या सवयीमुळे अनेक शारीरिक व्याधी निर्माण होऊ शकतात. घोरणे आणि स्लिप ॲपनिया यामुळे केवळ शेजारी झोपलेल्या व्यक्तीला नव्हे, तर स्वत:च्या शरीरात देखील बदल होत असतात. त्याच्या परिणामामुळे विविध आजार होऊ शकतात.
घोरल्यामुळे त्या व्यक्तीचे वजन वाढणे, डोके दुखणे, उच्चरक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, पक्षाघात यांचाही धोका असतो. मात्र, बहुतांश वेळा घोरण्याकडे दुर्लक्ष केले जाते. अनेकदा गाढ झोपेतील व्यक्तीला त्याच्या घोरण्याविषयी किंवा श्वास रोखला जाण्याची जाणीव नसते. मात्र, असे हे घोरणे त्यांच्या श्वसन मार्गावर ताण निर्माण करणारे असते. त्यामुळे दिवसा दम लागणे, झोप पूर्ण होऊनही ती पूर्ण न झाल्यासारखे वाटणे, रक्तदाब वाढणे अशा अनेक समस्या येतात.
घोरतो म्हणजे नक्की काय करतो
नाकाच्या मागे ते पडजिभेच्या मागेपर्यंत एक स्नायूंची नळी असते. ही नळी लवचीक (स्नायूंची) असते. श्वासोच्छवास सुरू असतानाही नळी जेव्हा कंप (व्हायब्रेट) पावते, तेव्हा आवाज होतो. यालाच घोरणे असे म्हणतात. कुठल्याही कारणाने ही नळी जर अरुंद झाली, तर तो व्यक्ती घोरतो.
..तर बीपी, डायबिटीजचा होऊ शकतो त्रास
- - घोरत असतान शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. त्यामुळे घोरणाऱ्या व्यक्तीला मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार यासारखे आजार होऊ शकतात.
- - घोरणाऱ्या व्यक्तीने त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
घोरण्याची कारणे काय ?
- - एखाद्या व्यक्तीच्या गळ्याजवळ चरबी वाढल्यास तो घोरतो. वजन योग्य असल्यास हा त्रास कमी होऊ शकतो.
- - अनुवंशिकता, धूम्रपान हे देखील घोरण्याचे कारण आहे. तसेच नाकपुड्या बंद झाल्यानेही घोरण्याची समस्या उद्भवू शकते.