अहो ऐकलं का; बिस्किटाचा नाही पत्ता अन् शाळेच्या खाऊत डाळी मिळताहेत पोतेभर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2022 03:52 PM2022-03-08T15:52:31+5:302022-03-08T15:52:38+5:30

शालेय पोषण आहाराचे वाटप सुरू; विद्यार्थ्यांना मिळाला दिलासा

Hey listen No address for biscuits | अहो ऐकलं का; बिस्किटाचा नाही पत्ता अन् शाळेच्या खाऊत डाळी मिळताहेत पोतेभर

अहो ऐकलं का; बिस्किटाचा नाही पत्ता अन् शाळेच्या खाऊत डाळी मिळताहेत पोतेभर

Next

सोलापूर : कोरोनाची तिसरी लाट ओसरल्यानंतर लगेच शाळा सुरू झाल्या; परंतु विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराचा पत्ता नाही. याविषयी ओरड सुरू झाल्यावर कोरोना काळातील ७ महिन्यांच्या हरभरा व मूग डाळीचे वाटप सुरू झाले आहे. दिवसाप्रमाणे वजनाचे हिशोब घालून विद्यार्थ्याकडे सुपूर्द केलेली ही डाळ नेण्यासाठी पालकांना घरून पोती आणावी लागत आहेत. आता नऊ महिन्यांचा तांदूळ येणार असून, यासाठीही पालकांना पोती शोधावी लागणार आहेत.

कोरोनामुळे यंदाच्या शैक्षणिक सत्रात शाळा सुरू झाल्या नव्हत्या. त्यामुळे सलग दुसऱ्या वर्षी पोषण आहाराची खिचडी शिजली नाही. साथीच्या उपाययोजनेमुळे आहाराचे वाटपही करता येत नव्हते. त्यामुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर विद्यार्थ्यांना ज्वारी, नाचणी, बाजरीची पौष्टिक बिस्कीटे वाटण्याचा निर्णय झाला. यानुसार काही ठिकाणी ही बिस्किटे पाठविण्यात आली. पण सोलापूर शहरातील शाळा यापासून वंचित राहिल्या. तिसरी लाट ओसरल्यानंतर शाळा सुरू झाल्या. पोषण आहार व गणवेशासाठी पालकांची ओरड सुरू झाली. पोषण आहार वाटपाला सुरुवात झाली; परंतु बिस्किटाऐवजी पूर्वीप्रमाणे कोरडा आहार देण्याचे नियाेजन करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात शाळांना हरभरा व मूगडाळ पोहोच करण्यात आली आहे. सात महिन्यांचे प्रमाण घेऊन प्रत्येक विद्यार्थ्यांला डाळीचे वाटप शाळा-शाळांमधून सुरू झाले आहे.

पालक येतात पोते घेऊन

विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराचे प्रमाण ठरलेले आहे. पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्रतिमहिना ४ किलो डाळ द्यायची आहे. पाचवी ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्रतिमहिना ६ किलो डाळ द्यायची आहे. सात महिन्यांचा हिशेब केल्यास प्रत्येक विद्यार्थ्याला २८ ते ४२ किलो डाळ मिळत आहे. त्यामुळे इतकी डाळ घरी नेण्यासाठी पालकांना पोतेच घेऊन यावे लागत आहे.

९ महिन्यांचे तांदूळ मिळणार

पहिल्या टप्प्यात डाळ वाटण्यात येत आहे. त्यामुळे शाळांच्या वर्गखोल्यांना गोदामांचे स्वरूप आले आहे. आता दुसऱ्या टप्प्यात ९ महिन्यांचे तांदूळ वाटपासाठी देण्यात येणार आहेत. महिन्याला दोन ते चार किलोप्रमाणे १८ ते ३६ किलो तांदूळ वाटप करायचा आहे. वजन करून प्रतिविद्यार्थी धान्य वाटपाची जबाबदारी शिक्षकांवर आल्याने शाळांमध्ये दिवसभर रेशन दुकानासारखे चित्र दिसत आहे.

 

गणवेश मिळाला नाहीच

समग्र शिक्षा अंतर्गत शासकीय शाळांमधील पहिली ते आठवीत शिकणाऱ्या मुली व मागासवर्गीय, दारिद्र्यरेषेखालील मुलांना मोफत गणवेशासाठी प्रत्येकी ३०० रुपयांप्रमाणे जिल्हा परिषदेने अनुदान वाटप केले आहे. शालेय समितीने हे गणवेश खरेदी करून विद्यार्थ्यांना वाटप करायचे आहेत. बऱ्याच शाळांनी ही प्रक्रिया पार पाडली नसल्याची पालकांची तक्रार आहे.

-------------

असे आहेत लाभार्थी

  • एकूण मुली : १०३४८१
  • मागासवर्गीय मुले : २११८१
  • दारिद्र्यरेषेखालील मुले : २४४०२

-------------

पोषण आहार अंतर्गत १५३ दिवसांच्या डाळीचे वाटप करण्यात येत आहे. त्यानंतर तांदळाचे वितरण केले जाणार आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी बिस्कीट वाटपाचा निर्णय झाला होता. आता संसर्ग कमी झाल्याने धान्य वाटप करण्यात येत आहे. ९ मार्चपासून शाळेत आहार देण्यात येईल.

- डॉ. किरण लोहार, शिक्षणाधिकारी

 

Web Title: Hey listen No address for biscuits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.