महातपूरमध्ये उसाच्या फडात लपलेल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:17 AM2021-07-20T04:17:22+5:302021-07-20T04:17:22+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क माढा : पोलिसांना धक्काबुक्की करून माढा स्टेशनच्या सबजेलमधून चार आरोपींनी पळ काढला. मात्र, जवळच्या महातपूरमध्ये उसाच्या ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
माढा : पोलिसांना धक्काबुक्की करून माढा स्टेशनच्या सबजेलमधून चार आरोपींनी पळ काढला. मात्र, जवळच्या महातपूरमध्ये उसाच्या फडात लपल्याची माहिती मिळताच माढा पोलिसांनी सापळा लावला अन् पाऊलखुणांवरून शोधत एका आरोपीला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे.
आकाश ऊर्फ अक्षय रॉकी भालेकर असे उसाच्या फडात पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
बनावट चलन प्रकरणातील सिद्धेश्वर शिवाजी केचे (टेंभुर्णी पोलीस स्टेशन), बेकायदेशीरपणे हत्यार बाळगल्याप्रकरणी अकबर सिद्दाप्पा पवार (कुर्डूवाडी पोलीस स्टेशन), खून प्रकरणात आकाश ऊर्फ अक्षय रॉकी भालेकर (टेंभुर्णी पोलीस स्टेशन), पास्को प्रकरणात तानाजी नागनाथ लोकरे (कुर्डूवाडी पोलीस स्टेशन) या चौघांना पकडून माढा उपकारागृहात ठेवले होते. सोमवार, १९ जुलै रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास या आरोपींनी पळून जाण्याची योजना आखली.
यापैकी अकबर पवार याने झटका आल्याचा बनाव केला. उपचारासाठी त्याला दवाखान्यात नेण्यासाठी पोलिसांनी दरवाजा उघडला. इतक्यात पोलीस आणि येथील आरोपींत झटापट झाली अन् सबजेलमधून चौघांनी पळ काढला. भांगे वस्ती परिसरातून पळून गेलेे.
यांच्यापैकी आकाश हा महातपूर येथे एका उसाच्या फडात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्या शेतात धाव घेतली आणि सापळा लावला. तो पोलिसांना पाहून पळून जाण्याचा प्रयत्न करीत उसाच्या फडात पुन्हा जाऊन लपला. मात्र, मोठ्या प्रमाणात पडलेल्या पावसामुळे त्याला पुढे पळता आले नाही. याच पाऊलखुणांवरून पोलीस नाईक विशाल पोरे, पोलीस शिपाई संजय घोळवे, मनोज शिंदे, होमगार्ड शिवाजी भांगे यांनी पाठलाग करीत त्याला ताब्यात घेतले.
अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक किरण घोंगडे करीत आहेत. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक किरण घोंगडे करीत आहेत.
---------
नाकाबंदीत लागले नाहीत हाती
याबाबत माढा सबजेलमध्ये सेवेवर कार्यरत असलेले पोलीस नाईक डुकरे यांनी सकाळी चार आरोपी धक्का मारून पळाल्याची फिर्याद दिली. या घटनेनंतर माढा पोलिसांनी तत्काळ शहरात ठिकठिकाणी नाकेबंदी केली. मात्र, या नाकाबंदीत ते पोलिसांच्या हाती लागू शकले नाही.
-----
फोटो : १९ आकाश आणि चार फोटो