‘इलेक्शन वॉररूम’च्या जागेवरून भाजपच्या दोन गटात ‘छुपे वॉर’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2019 12:09 PM2019-03-29T12:09:48+5:302019-03-29T12:13:28+5:30
सोलापूर लोकसभेची जबाबदारी पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि माढ्याची जबाबदारी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यावर टाकण्यात आली .
राकेश कदम
सोलापूर : आपल्या उमेदवाराच्या प्रचार यंत्रणेवर लक्ष ठेवताना प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी भाजपकडून ‘वॉररूम’ स्थापन करण्यात येणार आहे. पण गेल्या चार दिवसांपासून ‘वॉररूम’च्या जागेचा शोध कायम आहे. यावरून दोन गटांत कुरबुरी झाल्या आहेत.
भाजपचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर यांच्यासाठी मध्यवर्ती प्रचार कार्यालय सुरू करण्यात येणार आहे. या प्रचार कार्यालयात एक वॉररूम असणार आहे. सहकारमंत्री गटातील नगरसेवकांनी यासाठी सम्राट चौकातील बसवंती मंगल कार्यालयाचा पर्याय सुचविला होता. या मंगल कार्यालयाचे उद्घाटन माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते करण्यात आले आहे. या ठिकाणी पार्किंगची मोठी व्यवस्था असल्याने हे कार्यालय सर्वांच्या सोयीचे होईल, असे सांगण्यात आले. परंतु, बसवंतींच्या नावावर फुली मारण्यात आली. त्यानंतर प्रभात टॉकीजच्या शेजारील एका व्यावसायिक इमारतीतील जागा निश्चित करण्यात आली, पण या जागेत पाण्यासह इतर सुविधा नसल्याचे निदर्शनास आले.
त्यामुळे ही जागाही रद्द करण्यात आली. यानंतर शहरातील काही मंगल कार्यालये आणि व्यावसायिक जागांची पाहणी करण्यात आली आहे, पण दोन्ही गटांचे त्यावर एकमत झालेले नाही. भाजप नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी सकाळी गजबजलेल्या ठिकाणातील जागा निश्चित करण्याचा प्रयत्न सुरू होता. किमान कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना गाड्या लावण्यापुरती जागा असू द्या, असेही दुसºया गटाकडून सांगण्यात आले. त्यावर सायंकाळपर्यंत खल सुरू होता. दोन गटांच्या या ‘छुप्या वॉर’मध्ये ‘वॉररूम’ची जागा निश्चित झालेली नव्हती.
‘संघ’ प्रतिनिधी राहणार दक्ष!
- सोलापूर लोकसभेची जबाबदारी पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि माढ्याची जबाबदारी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यावर टाकण्यात आली असली तरी दोन्ही मतदारसंघातील हालचालींवर भाजपची ‘संघटन’ शाखा लक्ष ठेवणार असल्याचे वरिष्ठ नेत्यांकडून सांगण्यात आले. ‘वॉररूम’मधून सोशल मीडिया, प्रचार यंत्रणा, बैठका, जाहीर सभा आदींच्या कामांचे नियोजन करण्यात येणार आहे.
महायुतीच्या सर्वच नेत्यांना सोबत घेणार
- महायुतीचा मेळावा नुकताच हेरीटेज गार्डनमध्ये झाला. या मेळाव्यात केवळ भाजपचे झेंडे होते. त्यावरून शिवसेनेच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती, पण पुढील काळात होणाºया मेळाव्यांमध्ये भाजप, शिवसेना, रासप, रिपाइं (आठवले) गटाचे कार्यकर्ते असावेत, त्यांचे झेंडे लावावेत, यासाठी प्रयत्न राहणार आहेत. भाजपचे सहनिवडणूक प्रमुख किशोर देशपांडे म्हणाले, पुढील दोन दिवसांत मंडलनिहाय बैठका होतील. त्यानंतर महायुतीचा मेळावा होईल. त्यानंतरच जाहीर सभांचे नियोजन करण्यात येणार आहे. महायुतीच्या सर्व घटक पक्षांना सोबत घेऊनच कार्यक्रम होणार आहेत.