बारामती परिमंडलात ५७८ कोटींची सर्वाधीक वीज थकबाकी सोलापुरात
By काशिनाथ वाघमारे | Published: March 20, 2023 05:57 PM2023-03-20T17:57:17+5:302023-03-20T17:57:32+5:30
बारामती परिमंडलात सर्वाधिक वीजथकबाकी सोलापूर जिल्ह्यात ५७८ कोटी आहे.
सोलापूर : बारामती परिमंडलात सर्वाधिक वीजथकबाकी सोलापूर जिल्ह्यात ५७८ कोटी आहे. त्या खालोखाल सातारा जिल्ह्यात २०२ कोटी तर बारामती मंडलात ही थकबाकी ३६८ कोटी इतकी आहे. थकबाकी वसुलीसाठी महावितरणने विभाग व उपविभागनिहाय पथके तयार केली आहेत. सुट्टीच्या दिवशी सुद्धा महावितरणचे कर्मचारी ग्राहकांपर्यंत जाऊन थकबाकी वसुली करत आहेत. तसेच सुटीच्या दिवसीही वीज बिल भरणा केंद्र सुरू ठेवण्यात आल्याची माहिती बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनिल पावडे यांनी दिली.
मार्च २०२३ चालू आर्थिक वर्ष संपण्यास दहा दिवस शिल्लक आहेत. गुढीपाडव्यापासून मराठी नववर्ष सुरु होत आहे. आर्थिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर महावितरण कंपनीने बारामती परिमंडलात वीजबिल वसुलीची मोहीम तीव्र केली आहे.
पुण्यातील सहा तालुके व सोलापूर, सातारा जिल्ह्याचे कार्यक्षेत्र असलेल्या महावितरण बारामती परिमंडलात ४ लाख ६५ हजार ६७४ अकृषी वीज ग्राहकांची थकबाकी तब्बल १,१४९ कोटींवर पोहोचली आहे. या अकृषी थकबाकीमध्ये दिवाबत्तीची सर्वाधिक ८७५ कोटींची थकबाकी आहे. त्याखालोखाल पाणीपुरवठा २०८ कोटी, घरगुती ४० कोटी, सार्वजनिक सेवा ९ कोटी ४५ लाख तर वाणिज्यिक ग्राहकांकडे ८ कोटी ७९ लाखांची थकबाकी येणे आहे. ही वसुली करताना वीज कर्मचारी व ग्राहक यांच्यात संघर्ष देखील होत आहे.
-----
सोलापूर जिल्ह्यात थकबाकी सर्वाधीक असली तरी ती वसूल करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यात २५ सब डीव्हीजन असून २५ पथके नेमली आहेत. याशिवाय शाखा कार्यालयाचेही काही कर्मचारी वसुलीसाठी प्रयत्न करताहेत.
- संतोष सांगळे
अधीक्षक अभियंता, सोलापूर जिल्हा