परगावच्या खरेदीदारांकडून सोलापुरातील बेदाण्याला प्रतिकिलो सर्वाधिक २५१ रुपयांचा दर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 12:01 PM2021-03-05T12:01:07+5:302021-03-05T12:02:00+5:30
सोलापूर कृषी वार्ता...
सोलापूर : सोलापूरबाजार समितीत गतवर्षी कोरोनामुळे थांबलेला बेदाणा लिलाव यावर्षी गुरुवारी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू झाला. किलोला सर्वाधिक २५१ रुपये, तर सर्वसाधारण १७५ रुपये इतका दर मिळाल्याचे सांगण्यात आले.
मागील वर्षी मार्च महिन्यात राज्यभरात कोरोनामुळे सर्वच ठिकाणचे बेदाणा लिलाव बंद ठेवावे लागते होते. मात्र, जूननंतर पिंपळगाव बसवंत ( नाशिक) बाजार समितीत लिलावाला सुरुवात झाली होती. इकडे सांगली, तासगाव, पंढरपूर व सोलापूर बाजार समितीत लिलाव न होता व्यापाऱ्यांनी बेदाणा विक्री केला होता.
यावर्षीही द्राक्ष, बेदाण्याची विक्री सुरू झाल्यानंतर पुन्हा कोरोनाचे संकट सुरू झाले आहे. मात्र, बेदाण्याचे लिलाव राज्यभरातील बाजार समितीत सुरू झाले आहेत.
गुरुवार दिनांक ४ मार्च रोजी सोलापूर बाजार समितीत १५ टन बेदाणा विक्रीसाठी आला होता. त्यापैकी ७ टन बेदाण्याची लिलावात विक्री झाल्याचे या विभागाचे प्रमुख सचिन ख्याडे यांनी सांगितले. कमीत कमी ४० रुपये, तर सर्वाधिक १७५ रुपये किलोला दर मिळाला. सरासरी १७५ रुपयांचा दर बेदाण्याला मिळाला.
परगावचे खरेदीदार
लिलावात सांगली, तासगाव, पंढरपूर, विजापूर व सोलापूरच्या खरेदीदारांनी भाग घेतला. लिलावावेळी सभापती, आमदार विजयकुमार देशमुख, उपसभापती श्रीशैल नरोळे, संचालक बाळासाहेब शेळके, बसवराज इटकळे, शिवानंद पुजारी, राजकुमार वाघमारे, सचिव आंबादास बिराजदार आदी उपस्थित होते.