उच्चशिक्षित सुनीलनेघरपोच द्राक्ष विक्रीतून मिळविले सहा लाखांचे उत्पन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2020 08:58 AM2020-04-16T08:58:02+5:302020-04-16T09:05:03+5:30
लॉकडाऊनवर मात; देवळालीच्या सुनील ढेरे या शेतकºयाची अशीही जिद्द
नासीर कबीर
करमाळा : जिद्द नाही तो शेतकरी कसला... कैक संकटांवर मात करणाºया शेतकºयानं लॉकडाऊन काळातही आपला चिवटपणा सोडला नाही. त्याच्या चिकाटी अन् मेहनतीच्या जोरावरच करमाळा तालुक्यातील देवळालीच्या सुनील उत्तम ढेरे या तरुण शेतकºयानं लॉकडाऊन काळात निराश न होता २१ दिवसात १५ टन द्राक्ष घरोघरी फिरून विक्री करत तब्बल ६ लाख रुपयांची कमाई केली आहे. त्यासाठी स्वतंत्र विक्री व्यवस्था उभी करत लॉकडाऊनवर मात केली आहे.
देवळाली (ता.करमाळा) येथील सुनील उत्तम ढेरे हा एम.ए.बी.एड. शिक्षित असून, शिक्षकाच्या नोकरीसाठी लाखो रुपये मागणी झाली पण सुनीलची घरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने तो पैसे देऊ शकला नाही. त्यांनी हार मानली नाही. वडील उत्तम ढेरे,पत्नी सविता, भाऊ रमेश व भावजय शोभा यांना बरोबर घेऊन २००६ मध्ये साडेतीन एकरात द्राक्ष बाग केली. पहिल्या टप्प्यात एक एकरात ७ लाख रुपये उत्पन्न मिळाले दुसºया टप्प्यात ८ लाख रुपये उत्पन्न मिळाले.
ऐन द्राक्ष छाटणीचा हंगाम सुरू झालेला असताना कोरोना विषाणूचा फैलाव देशात व राज्यात मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू झाला. देशात लॉकडाऊन जाहीर झाल्याने राज्यातील बाजार बंद झाले. तालुक्यातील अनेक द्राक्ष बागायतदारांनी लॉकडाऊन सुरू झाल्याने बेदाणा केला तर काहींनी बाग तोडून टाकली. अशी गंभीर परिस्थिती निर्माण झालेली असताना सुनीलने निराश न होता आपली द्राक्ष आपल्या गावातच स्वतंत्र विक्री व्यवस्था निर्माण करून विकायची असे ठरवले. मग लॉकडाऊनमध्ये शहरातील सोशल मीडियावरून घरपोच द्राक्ष विक्रीची जाहिरात केली.
पोलीस-प्रशासनाचे प्रोत्साहन अन् पाठबळ..
- लॉकडाऊनच्या कालावधीत आपला माल कसा विक्री करायचा असा मोठा प्रश्न होता. आपण येथील पोलीस निरीक्षक श्रीकांत पाडुळे यांची ठाण्यात जाऊन समक्ष भेट घेतली. सर्व परिस्थिती सांगितली. मग सोशल डिस्टन्स, सॅनिटायझर व मास्क आदीचा वापर करून वाहनावर परवाना लावून द्राक्ष विक्री करण्यास परवानगी दिली व त्यामुळेच हे सर्व शक्य झाले असे द्राक्ष उत्पादक शेतकरी सुनील ढेरे यांनी सांगितले.
२१ दिवसात १५ टन माल हातोहात विकला
- सुनीलने जुन्या मारुती कारमध्ये एका वेळेस २० कॅरेट माल फिरून तीन फेºयाद्वारे करमाळा शहर व परिसरात गल्ली-बोळातून, घरोघरी जाऊन प्रतिकिलो ५० रुपयांप्रमाणे ५ किलो पॅकिंग करून द्राक्ष विक्री केली. शिवाय शहरातील छोटे १४ हातगाडी व फेरीवाले यांच्याशी संपर्क करून त्यांना ४० रुपये किलोने माल दिला व बघता बघता लॉकडाऊनच्या २१ दिवसात सुनीलने १५ टन माल विक्री केला.त्यातून त्यास ६ लाख रुपये मिळाले. या युवा शेतकºयाने सॅनिटायझर व मास्कचा वापर करत ग्राहकाचा विश्वास संपादन केला.