महामार्गांच्या कामातून मिळेल सोलापूरच्या विकासाला चालना : पालकमंत्री विजय देशमुख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2018 01:11 PM2018-05-02T13:11:19+5:302018-05-02T13:11:19+5:30
सोलापूर : राष्ट्रीय महामार्गाच्या विकास आणि चौपदरीकरणातून सोलापूरच्या विकासाला चालना मिळेल, असा विश्वास पालकमंत्री विजय देशमुख यांनी येथे व्यक्त केला.
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 58 व्या वर्धापन दिनानिमित्त पोलीस परेड ग्राऊंड येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला. त्यावेळी पालकमंत्री देशमुख बोलत होते. यावेळी पोलीस आयुक्त एम.बी.तांबडे, प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, पोलीस अधीक्षक वीरेश प्रभु, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, महापालिका आयुक्त अविनाश ढाकणे, पोलीस उपायुक्त नामदेव चव्हाण आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या आजच्या 58 व्या वर्धापनदिनानिमित्त पोलीस परेड ग्राऊंडवर ध्वजारोहण आणि संचलनाचा कार्यक्रम झाला. यावेळी पालकमंत्री देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. पोलीस दलाच्या विविध पथकांनी संचलनाद्वारे मानवंदना दिली. त्याचबरोबर पोलीस महासंचालक पदक मिळालेले पोलीस अधिकारी, कर्मचारी, गुणवंत तलाठी यांचा सत्कार करण्यात आला.
पालकमंत्री देशमुख म्हणाले, सोलापूर- सांगली, सोलापूर- विजापूर, सोलापूर- तुळजापूर याचबरोबर जिल्ह्यातून जाणारे पालखी मागार्चे चौपदरीकरण केले जाणार आहे. या रस्त्यांना राष्ट्रीय महामागार्चा दर्जा देण्यात आला आहे. या रस्त्यांच्या विकासामुळे सोलापूर जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळेल. सोलापूरचा विविध शहरांशी जलद संपर्क झाल्यामूळे व्यापार, उद्योग याचबरोबर जिल्ह्यातील धार्मिक पर्यटनाला चालना मिळेल.
जिल्ह्यात मुद्रा बँक योजनेतून 1022 कोटी रुपयांचे कर्ज वितरण करुन राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या माध्यमातून जिल्ह्यात नवउद्योजक घडतील, असा विश्वास व्यक्त करुन पालकमंत्री देशमुख म्हणाले, जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून एक लाख आठ हजार शेतक-यांना 561 कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात आली आहे. जलयुक्त शिवार योजनेच्या कामांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी होत आहे. जिल्ह्याने यंदाही राज्यात प्रथम क्रमांक पटकावला पाहिजे.
जिल्हा परिषद विविध योजनांच्या माध्यमातून विकास विषयक चांगले काम करीत आहे. विशेषत: आरोग्याच्या क्षेत्रात जिल्हा परिषदेने केलेले काम उल्लेखनीय आहे. स्वच्छ भारत योजनेची प्रभावी अंमलबजावणी करुन जिल्हा परिषदेने नवा पॅटर्न विकसित केला आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यात 300 किलोमीटरवर रस्ते तयार होतील. यामुळे गावांचा शहरांशी असणारा संपर्क वाढेल, असेही देशमुख म्हणाले.
यावेळी विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. तत्पूर्वी, जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले तर मध्यवर्ती इमारत येथे तहसिलदार अमित माळी यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.