हिरेहब्बूंनी पंधरा तोळे सोनं दिल्यासारखं केलं; घेतल्यासारखं करून करजगींनी पुन्हा परत केलं !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2022 08:08 PM2022-02-08T20:08:07+5:302022-02-08T20:08:23+5:30
पहिल्या नंदीध्वजाला म्हणं मुलामा देणार : देवस्थान कमिटीच्या नोटिसीनंतर घडामोडी
सोलापूर : ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या यात्रेतील मानाच्या पहिल्या नंदीध्वजास सोन्याचा मुलामा देण्यासाठी कुमार करजगी यांनी दिलेले १५ तोळे सोनं मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांनी सोमवारी त्यांना दिल्यासारखं केलं. घेतल्यासारखं करून कुमार करजगी यांनी तेच सोनं पुुन्हा हिरेहब्बूंच्याच हाती ठेवलं. पहिला नंदीध्वजावर आमचा हक्क असल्याने पंच कमिटीने धाडलेल्या नोटिसीनंतर या घडामोडी घडल्या. हिरेहब्बूंच्या वाड्यातच पहिल्या नंदीध्वजाला सोन्याचा मुलायम देण्याचे काम सुरू आहे, हे काम स्वत: करजगी यांनी घेतले असले तरी ते कारागिरांकडे असल्याचे त्यांनी सांगितले.
यात्रेच्या आधी कुमार करजगी यांनी पहिल्या नंदीध्वजासाठी १५ तोळे सोने देण्याचे जाहीर केले. त्यानंतर ऐन यात्रेत हिरेहब्बूंच्या वाड्यात आयोजित बैठकीत त्यांनी १५ तोळे असलेले सोन्याचे बिस्कीट आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते हिरेहब्बूंकडे स्वाधीन केले. त्यानंतर हे प्रकरण सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीपर्यंत पोहोचले. मानाचा पहिला नंदीध्वज हा देवस्थान पंच कमिटीचा आहे. या नंदीध्वजाचा पूर्ण खर्च देवस्थान पंच कमिटीकडून होत असतो, असे असताना राजशेखर हिरेहब्बू यांनी भक्तगणांकडून परस्पर सोनं घेणे गैर असल्याचा आरोप पंच कमिटीच्या सदस्यांनी केला होता. सोनं गोळा करण्याचा त्यांचा अधिकार नाही, असे सुनावत कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही दिला होता. दरम्यान, यात्रा पार पडल्यावर मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांना नोटीस धाडण्यात आली. मात्र, हिरेहब्बूंनी नोटीस घेतली नसल्याचे समजते.
एकूणच १५ तोळे सोन्याचा विषय गाजत राहिला. भक्तगणांमध्येही उलटसुलट चर्चा सुरू झाली. सोनं प्रकरणावर कायमचा पडदा पडावा, ही भावना व्यक्त करून हिरेहब्बू यांनी दिलेले १५ तोळे सोनं कुमार करजगींना परत केलं. त्यावर कुमार करजगी यांनी एक तोडगा काढला. हिरेहब्बूही नाही ना पंच कमिटीही. त्यापेक्षा १५ तोळं सोन्याचा वापर नंदीध्वजालाच व्हावा असा विचार करून करजगी यांनी पुन्हा ते सोनं हिरेहब्बूंकडे दिल्याचे समजते.
धर्मादाय आयुक्तांना पै-पैचा हिशेब द्यावा लागतो : काडादी
मानाचा पहिला नंदीध्वज हा पंच कमिटीचा असून, यात्रा कालावधीत त्या नंदीध्वजाचा खर्च पंच कमिटी करीत असते. त्यामुळे नंदीध्वजासाठी सोन्याच्या रूपात येणारी देणगी ही पंच कमिटीला दिली पाहिजे. असे असताना हिरेहब्बू यांनी परस्पर सोनं घेतले, हे गैर आहे. पंच कमिटीला धर्मादाय आयुक्त कार्यालयात पै-पैचा हिशेब द्यावा लागतो. सोनं परत करण्यासाठी आम्ही हिरेहब्बू यांना नोटीस पाठवली आहे. नोटिसीला उत्तर आल्यावरच पुढील निर्णय घेऊ, असे पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी सांगितले.
१५ तोळं सोनं देण्यावरून वाद निर्माण झाला आहे. मी पंच कमिटीलाही दिले नाही ना हिरेहब्बूंना. मी सोनं दिलं आहे, ते सिद्धरामांना. काडादी-हिरेहब्बू यांच्यातील वाद मिटावा, ही माझी प्रामाणिक इच्छा आहे. सोनंरूपी देणगी दिली असली तर ते गुप्तदान आहे. मला पावतीची गरज नाही. सध्या सोनं हैदराबादच्या कारागिराकडे आहे. काडादी-हिरेहब्बू यांनी एकत्र बसून हा वाद मिटवावा.
-कुमार करजगी, उद्योजक.
----
सोनं प्रकरणामुळे विनाकारण वाद निर्माण झाला आहे. भाविकांचा विचार करून आपण प्रामाणिकपणाने १५ तोळं सोनं कुमारा करजगींना परत केले. नंदीध्वजास मुलामा देण्याचा त्यांचा इरादा कायम होता. मुलामा देण्याच्या कामासाठी त्यांनी हैदराबादच्या कारागिरांना बोलावून घेतले आहे. १४ हरडे, १३ पट्ट्या आणि कळसाला मुलामा देण्याचे काम सुरू आहे. सोनं कारागिरांकडेच आहे.
-राजशेखर हिरेहब्बू, मानकरी.