महिला अत्याचाराच्या घटनांविरोधात वकिलांचे पथक नेमणे आवश्यक : चित्रा वाघ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 12:16 PM2020-02-21T12:16:55+5:302020-02-21T12:20:27+5:30
सोलापुरातील पीडित मुलीची केली चौकशी; कायदे मजबूत पण अंमलबजावणी होत नसल्याचीही व्यक्त केली खंत
सोलापूर : राज्यात महिलांवरील अत्याचार वाढत आहेत. या प्रकरणातील दोषींना लवकरात लवकर शिक्षा व्हावी, यासाठी वकिलांचे पथक नेमणे आवश्यक आहे, असे भाजप महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी ‘लोकमत‘ शी बोलताना व्यक्त केले.
सोलापूर येथील एका अल्पवयीन मुलीवर १६ जणांनी अत्याचार केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. या मुलीची चौकशी करण्यासाठी चित्रा वाघ गुरुवारी दौºयावर आल्या होत्या. पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर त्यांनी ‘लोकमत’ शी संवाद साधला. चित्रा वाघ म्हणाल्या, राज्यातील महिलांची सुरक्षा वाºयावर गेल्यासारखे वाटत आहे. हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याला शोभणारे नाही. राज्यात सरकार कोणाचेही असो त्यांचा पहिला अजेंडा महिलांची सुरक्षा असायला हवा.
आपल्या देशात कायदे मजबूत आहेत, मात्र त्याची अंमलबजावणी व्यवस्थित होत नाही. प्रत्येक गुन्ह्याचा खटला दीर्घकाळ चालतो, हे बंद झाले पाहिजे. महिला सुरक्षेसाठी काही उपाययोजना आवश्यक आहेत. त्या दृष्टीने मागण्यांचे निवेदन घेऊन आम्ही राज्यपालांना भेटणार आहोत. आपल्याकडील कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी केल्यास नवीन कायद्याची गरज भासणार नाही. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, शहराध्यक्ष विक्रम देशमुख, शहर सरचिटणीस शशी थोरात आदी उपस्थित होते.
पीडित मुलगी, कुटुंबीयांना समुपदेशाची गरज
- सोलापुरातील पीडित अल्पवयीन मुलीची मी भेट घेतली. तिला आणि तिच्या कुटुंबीयांना सध्या समुपदेशनाची गरज आहे. शासनाच्या मनोधैर्य निधीतून तातडीची मदत देणे गरजेचे आहे. या मुलीच्या कुटुंबीयांची सुरक्षा महत्त्वाची आहे. सरकारने त्यांची सर्व व्यवस्था मोफत करावी. सरकारने संरक्षणाची जबाबदारी घ्यावी, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली.
-