सोलापूर शहरातील दत्त मंदिरांना ऐतिहासिक वारसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 12:35 PM2018-12-22T12:35:43+5:302018-12-22T12:37:17+5:30
भाविकांचा उत्साह : गुलाल, पाळणा, पालखी मिरवणुकीचे आयोजन
सोलापूर : सोलापुरातील दत्त मंदिरांना तीस ते शंभर वर्षांची परंपरा असून, मेकॅनिकी चौक, दत्त चौकातील मंदिरे आता शतक महोत्सव साजरा करीत आहेत. याशिवाय पूर्वभाग, जुळे सोलापूर, शेळगी येथील मंदिरेही तीस ते साठ वर्षांपूर्वी स्थापन झालेली आहेत. उद्याच्या दत्त जयंतीनिमित्त या मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून दत्तभक्तीचा जागर होत आहे.
मेकॅनिक चौकात १९२० साली स्थापन करण्यात आलेल्या दत्त मंदिरातही जयंतीनिमित्त आठ दिवसांपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी बारा वाजता दत्त जयंती उत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सकाळी दहा ते दुपारी बारा या वेळेत हभप हरिभाऊ कुलकर्णी यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. जयंती उत्सवानंतर महाप्रसाद वाटप होईल. जयंतीनिमित्त होणाºया धार्मिक कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आनंद नारायण कलवार यांनी केले आहे.
दत्त चौकातील दत्त मंदिरातही जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, त्यानिमित्ताने मंदिरात शुक्रवारी उशिरापर्यंत स्वच्छता व सजावट पुजाºयांकडून सुरू होती. जयंतीदिनी अभिषेकाची पावती करण्यासाठी यावेळी भाविकांची गर्दी दिसून येत होती. भवानीपेठ मड्डी वस्ती येथे असणाºया दत्त मंदिरातही जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्याची धावपळ सुरू असल्याचे दिसून आले.
पूर्व भागातील दत्त नगर येथे १९६३ साली स्थापन करण्यात आलेल्या दत्त मंदिरात जयंतीनिमित्त सायंकाळी साडेचार वाजता दत्त जन्मोत्सव गुलाल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी हभप विष्णू लिंबोळे महाराज व परमात्मानंदगिरी स्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सायंकाळी सात ते रात्री दहापर्यंत पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. या सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन दत्तात्रय सिंगम यांनी केले आहे.
जुळे सोलापुरातील कल्याण नगर येथे तीस वर्षांपूर्वी स्थापन करण्यात आलेल्या दत्त मंदिरात सायंकाळी चार ते सहा या वेळेत हभप शाम जोशी महाराज यांच्या हस्ते दत्त जन्मोत्सव गुलाल कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यानंतर पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. या कार्यक्रमात भाविकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन विश्वनाथ शेगावकर यांनी केले आहे.