सोलापूरच्या किर्ती भराडियाने रचला इतिहास; १० तास २५ मिनिटे समुद्रात पोहून पार केले भारत - श्रीलंका अंतर
By Appasaheb.patil | Published: September 20, 2024 06:59 PM2024-09-20T18:59:07+5:302024-09-20T18:59:19+5:30
या ऐतिहासिक क्षणाला वर्ल्ड रेकॉर्ड कम्युनिटीचे उच्च अधिकारी उपस्थित होते. त्यांनी कीर्तीला विश्र्व विक्रमाचे प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले.
आप्पासाहेब पाटील
सोलापूर : मुळ सोलापूर शहरात राहणारी किर्ती नंदकिशोर भराडिया (वय १८) हिने श्रीलंका ते भारत हे ३२ किलोमीअरचे अंतर समुद्रात न थांबता १० तास २५ मिनिट पोहून पूर्ण केले. यावेळी किर्तीने श्रीलंकेतील तलाईमनार येथील समुद्रात झेप घेत खारे पाणी, लहान, मोठे जलचर जीव, उलढ्या लाटांचा प्रवास, मोठया लाटांचा प्रवास यासह अन्य अडचणींचा सामना करीत ऐतिहासिक कामगिरी पूर्ण केली. या ऐतिहासिक क्षणाला वर्ल्ड रेकॉर्ड कम्युनिटीचे उच्च अधिकारी उपस्थित होते. त्यांनी कीर्तीला विश्र्व विक्रमाचे प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले.
दरम्यान, किर्ती भराडिया हिने १५ सप्टेंबर २०२४ राेजी आपल्या आई वडिलांसमवेत ला रवाना झाली. १७ तारखेला रामेश्वर येथे पोहोचली. १९ सप्टेंबरला कीर्तीचे फिटनेस तपसण्यात आले आणि त्यादिवशी दुपारी १ वाजता रामेश्वर येथून किर्ती बोटिने श्रीलंकेसाठी रवाना झाली. किर्ती सोबत तिच्या प्रशिक्षिका रुपाली रेपाळे, अनिरुद्ध महाडिक, वडील नंदकिशोर, काका द्वारकादास, भाऊ अविनाश व रेस्क्यू टीमचे १५ जण असे एकूण २० जण व इंडीयन नेव्हीचे जवान होते. श्रीलंका हद्दीत तेथील नेव्ही ने कीर्तीचे स्वागत केले व पूर्ण सहकार्य केले. सर्वजण सायं ६ वाजता श्रीलंकेतील तलाईमनार येथील समुद्रकिनारी पोहोचले. २० सप्टेंबरच्या पहाटे १.४५ वाजता कीर्तीने समुद्रात झेप घेतली. रात्रीच्या काळोख्या अंधारात किर्ती कशाची सुद्धा तमा न बाळगता फक्त हात पाय मारत होती.
दरम्यान, अरबी समुद्र व बंगालचा उपसागर असे २ समुद्र एकत्रित असल्याने कीर्तीला लाटांच्या उलट प्रवाहांचा सामना मोठ्या प्रमाणात करावा लागला. तसेच हात पाय मारत दुपारी १२ वाजून १० मिनिटाला धनुश्यकोडीला पोहोचली आणि हा विक्रम स्वतच्या नावावर करून घेतला. हा विक्रम साध्य करण्यासाठी कीर्तीला रुपाली रेपाळे, अनिरुद्ध महाडिक, श्रीकांत शेटे, स्कूल ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी, पुणे, सेहतच्या संचालिका राधिका मालू, सोलापूर महानगरपालिका, इलिजियम क्लब, डॉ .सोनाली घोंगडे, नीरज काटकुर, भराडिया मित्र परिवार यांचे विशेष सहकार्य लाभले.