जूनमध्येही हिट.. वर्गात सुटतोय घाम; पत्र्याच्या शाळेत शिकताना मुलांची दमछाक!
By शीतलकुमार कांबळे | Published: June 21, 2023 03:29 PM2023-06-21T15:29:20+5:302023-06-21T15:31:30+5:30
शाळा सकाळी सुरू करण्याची मागणी : इतर जिल्ह्यांत अंमलबजावणी
शीतलकुमार कांबळे, सोलापूर : दरवर्षी जून महिन्यात पावसाचे आगमन होते. त्यामुळे तापमानात घट होते. यंदा मात्र जून महिना संपत आला तरी पावसाचा पत्ता नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना वर्गात गरम होत आहे. त्यामुळे शाळा सकाळच्या सत्रात भरवावी, अशी मागणी शिक्षक संघटनांकडून होत आहे.
जळगाव जिल्ह्यात सकाळच्या सत्रात शाळा भरविण्यात आल्या आहेत. त्याप्रमाणे सोलापूर जिल्ह्यातील शाळा सकाळच्या सत्रात भरवाव्यात, अशी मागणी सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक संघटनांच्या गुरुसेवा परिवाराच्या वतीने ग्रामविकास मंत्रालय व विभागीय आयुक्त पुणे यांच्याकडे करण्यात आली आहे.
उष्माघाताचा धोका
उन्हामुळे दुपारी वर्गात बसणे अशक्य होत आहे. यात भर म्हणून पिण्याचे पाणी गरम होत असल्यामुळे मुलांची तहानही भागेना अशी परिस्थिती आहे. यामुळे उष्माघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून पाऊस पडून उन्हाची तीव्रता कमी होईपर्यंत शाळा सकाळच्या सत्रात भरविण्याचे आदेश द्यावेत, असेही या निवेदनात म्हटले आहे.