हिटलर पंतप्रधान झाल्याने देशाच्या अस्तित्वाला धोका : सुजात आंबेडकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2019 01:07 PM2019-04-09T13:07:33+5:302019-04-09T13:17:36+5:30
सुशीलकुमार शिंदे काका तुम्ही वर्षातून किती दिवस सोलापुरात असता ते तरी सांगा? सुजात आंबेडकरांचा माजी केंद्रीय मंत्री शिदेंना प्रश्न.
कुरुल : मोदींच्या रुपात एक मनुवादी हिटलर या देशाचा पंतप्रधान झाला आणि पाच वर्षांत देशातील सार्वभौम संस्थेच्या अस्तित्वाला धक्का लावण्याचे काम सुरू झाले आहे. वंचित बहुजन आघाडीची भाजप आणि काँग्रेस या दोन शत्रूंसोबत लढाई आहे. काँग्रेसने गेल्या ६५ वर्षांत मागासवर्गीय, मुस्लीम समाजाला भाजपची भीती दाखवून वापरून घेतले. समाजाच्या उन्नतीसाठी काहीही केले नाही, याचा जाब आता विचारला पाहिजे. आंबेडकर उपरे आहेत असे म्हणणाºया सुशीलकुमार शिंदे यांनी तर गेल्या ४० वर्षांत सोलापूर जिल्ह्यासाठी नेमके काय केले ते आधी सांगावे. ना मुबलक पिण्याचे पाणी, ना तरुणांना रोजगार देणारा मोठा उद्योग आणला, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी केली.
वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांच्या प्रचारार्थ कुरुल येथील बाजारतळावर झालेल्या कॉर्नर सभेत ते बोलत होते. यावेळी साहिल आंबेडकर, पीपल्स रिपब्लिकन फ्रंटचे अध्यक्ष धनंजय आवारे, एमआयएमचे अध्यक्ष बिलाल शेख, शत्रुघ्न जाधव, बाळासाहेब लांडे, शशिकांत ठोकळे, विजय भालेराव उपस्थित होते.
सुजात आंबेडकर म्हणाले की, काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप-शिवसेना या सगळ्या पक्षांनी धनगर समाजाला आरक्षण देतो, म्हणून आजपर्यंत फसवले आहे. प्रकाश आंबेडकर हे सोलापुरात राहत नसल्याचे शिंदे सभेत सांगतात. शिंदे काका तुम्ही वर्षातून किती दिवस सोलापुरात असता ते तरी सांगा? असा प्रश्न विचारला.