शहरातील गरिब, वंचितांची होळी झाली गोड; हजार पुरणपोळ्यांचे वाटप
By शीतलकुमार कांबळे | Published: March 25, 2024 02:22 PM2024-03-25T14:22:05+5:302024-03-25T14:22:56+5:30
होळी करा लहान पोळी करा दान उपक्रम
शीतलकुमार कांबळे, सोलापूर : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सोलापूर शहर शाखेतर्फे होळी करा लहान पोळी करा दान हा उपक्रम घेण्यात आला. या अंतर्गत शहरात एकूण 1000 पोळ्यांचे संकलन अंनिसच्या तीन पुरणपोळी संकलन केंद्रात करण्यात आले. या पोळ्या वंचितांना देऊन त्यांचे तोंड गोड करण्यात आले.
या उपक्रमामुळे भुकेल्या गरिबांची सुद्धा होळी अत्यंत गोड झाली. जयहिंद फूड बँकेचे अध्यक्ष सतीश तमशेट्टी आणि अनिकेत सरवदे यांनी या उपक्रमात पोळ्या वाटप करण्यात सहकार्य केले. विविध पुरणपोळी संकलन केंद्रावर अनिसच्या असंख्य कार्यकर्त्यांनी हा विषय लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व पोळ्या जमा करण्यासाठी कष्ट घेतले.
अंनिसतर्फे कमीत-कमी आणि सुकी लाकडे व वाळलेला पालापाचोळा जाळून लहान होळी करा, पुरणपोळी नैवेद्य म्हणून जाळून टाकण्यापेक्षा गरीब गरजू नागरिकास दान करण्याचे आवाहन करण्यात आले होते. या सर्व विचारांनी प्रेरित होऊन शहरातील नागरिकांनी केंद्रात पुरणपोळ्या दान केल्या. अंनिस आणि जय हिंद फूड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने या पुरणपोळ्या अनेक झोपडपट्ट्यांमध्ये असणाऱ्या गरीब नागरिकांना देण्यात आल्या.