सुटीचा मूड कायम : शाळा बंदने मुलं खेळात रमली; अभ्यास पार विसरूनही गेली !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2021 12:46 PM2021-07-13T12:46:55+5:302021-07-13T12:47:19+5:30
ऑनलाइन अभ्यासाची सवय लागेना
सोलापूर : कोरोना प्रादुर्भावाच्या भीतीने मागील दीड वर्षापासून शाळा बंद आहेत. शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, याकरिता शिक्षण विभागाने सर्व शाळांनाऑनलाइन अभ्यासक्रम राबवण्याचे आदेश दिलेत. त्यानंतर प्रत्येक शाळेकडून ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू आहे. ऑनलाइन अभ्यासाची सवय अद्याप चिमुकल्यांना झालेली नाही. शाळा बंद असल्याने मुलं खेळात रमली. मात्र, सुटीचा मूड कायम असल्याने अभ्यासही विसरून गेली आहेत.
कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक असल्याचे तज्ज्ञ सांगतात. अशात प्राथमिक शाळा सुरू करायच्या की नाही याबाबत सरकारही मौन बाळगून आहे. सध्यातरी माध्यमिक शाळा सुरू करण्याच्या हालचाली आहेत. भविष्यात जर प्राथमिक शाळा सुरू झाल्या तर विद्यार्थ्यांचा मूड अद्याप शाळेत जाण्याचा नाही. चिमुकल्यांचा सुटीचा मूड कायम असून, अभ्यासक्रमाचा विसर पडत चालल्याच्या तक्रारी पालकांकडून होत आहेत. पहिली ते चौथीपर्यंत विद्यार्थ्यांची संख्या जवळपास पावणेतीन लाख आहे.
वर्गनिहाय विद्यार्थी
- पहिली-७०,६०६
- दुसरी-७६,१६७
- तिसरी-७६,०९८
- चौथी-७७,३११
सरकार शाळा सुरू करण्याच्या विचारात आहे. माध्यमिक शाळा सुरू होत आहेत म्हटल्यावर आम्ही मुलांना तुमच्याही शाळा सुरू होत आहेत असे सांगितल्यानंतर मुलं गप्प राहतायत, प्रत्युत्तर देईनात. निरुत्साह दाखवत आहेत.
- राजाराम शिंदे,
कोरोना असल्यामुळे मुलांनी दीड वर्षापासून ऑनलाइन अभ्यासक्रम पूर्ण केला. प्रत्यक्षात मुलांची अभ्यास करण्याची सवय मोडली. पुन्हा शाळा सुरू झाल्यानंतर शाळेला जाणार नाही, असे मुलं हट्ट करतायेत. अद्याप त्यांच्या मनात सुटीचा मूड कायम आहे.
- राजेंद्र साडे
अभ्यासक्रम टाळण्यासाठी ही आहेत कारणे
शाळा बंद असल्यामुळे मुलांचा एकाग्रपणा कमी झाला आहे. टीव्ही बघण्याचे प्रमाण वाढले. अभ्यासक्रमाला बसा असे जेव्हा पालक सांगतात तेव्हा मुलं विविध कारणे सांगतात. मन लागेना. अभ्यासक्रम लक्षात येईना. समजेना. यासह विविध प्रश्नांचा भडिमार पालकांवर होतोय. त्यामुळे पालक देखील मुलांच्या अभ्यासक्रमाला कंटाळले.
प्रेमानं बोलून सवयी पूर्ववत करा...
जोपर्यंत प्राथमिक शाळा सुरू होत नाहीत तोपर्यंत पहिली ते सातवीपर्यंत विद्यार्थ्यांची शाळा हे घरच राहणार आहे. त्यामुळे पालकांची जबाबदारी वाढली आहे. पालकांनी मुलांकडे विशेष लक्ष देऊन त्यांचे मनोबल वाढवावे. त्यांचा उत्साह वाढवावा. त्यांच्याशी गोडीगुलाबीने बोलून अभ्यासक्रम पूर्ण करून घ्यावा. विविध छंद जोपासण्यासाठी त्यांना प्रोत्साहन करा. प्रेमाने बोलून त्यांच्या सवयी पूर्ववत करून घ्याव्यात.