गृहकर्ज स्वस्त, पण बांधकाम साहित्य महाग; घर घेण्याचे स्वप्न कधी पूर्ण होणार ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 07:21 PM2021-07-29T19:21:38+5:302021-07-29T19:21:43+5:30
मागील वर्षभरात बांधकाम साहित्याच्या किमतीत तब्बल ३० ते ३५ टक्क्यांची वाढ
सोलापूर : ‘लग्न करून पाहावं आणि घर बांधून बघावं’ अशी एक म्हण प्रचलित आहे. आजच्या काळात घर बांधणे किती कठीण आहे याचा प्रत्यय बांधकाम साहित्य खरेदीसाठी गेलेल्या नागरिकांना येतोय. मागील वर्षभरात बांधकाम साहित्याच्या किमतीत तब्बल ३० ते ३५ टक्क्यांची वाढ झाली आहे.
त्यामुळे फ्लॅट खरेदी करताना किंवा घर बांधताना अनेक वेळा विचार करावा लागतोय. एकीकडे अशी परिस्थिती आहे, तर दुसरीकडे राष्ट्रीयीकृत बँकांनी गृहकर्जाच्या व्याजदरात सूट दिली आहे. गृहकर्ज स्वस्त झाले असले तरी बांधकाम साहित्याच्या किमती प्रचंड वाढल्यामुळे आमचं घर खरेदीचं स्वप्न कधी पूर्ण होणार?, अशा भावना सर्वसामान्य नागरिकांकडून व्यक्त होत आहेत.
बँकानिहाय गृहकर्जाचे व्याजदर
- बँक ऑफ इंडिया : ६.८५
- भारतीय स्टेट बँक : ६.७५
- बँक ऑफ महाराष्ट्र : ७.०५
- बँक ऑफ बडोदा : ६.८०
- कॅनरा बँक : ६.९५
घराचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी राष्ट्रीयीकृत बँकांकडून गृहकर्जाच्या व्याजदरात सूट देण्यात आली आहे. खातेदाराचा सिबिल स्कोअर पाहून राष्ट्रीयीकृत बँका गृहकर्जाचे व्याजदर ठरवितात. कमीत कमी ६.८५ ते ७.१० पर्यंत व्याजदर आहे.
- प्रशांत नाशिककर
प्रबंधक -जिल्हा अग्रणी बँक
........
सिमेंटच्या प्रति गोणीमागे शंभर रुपयांची वाढ झाली आहे, तसेच स्टीलच्या किमतीत वीस ते पंचवीस रुपयांची प्रतिकिलो वाढ झाली आहे. एकूण बांधकाम साहित्याच्या किमतीत ३० ते ३५ टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामुळे बांधकाम करणाऱ्यांचे प्रमाण कमी झाले आहे.
- शशिकांत जिड्डीमनी
बांधकाम उद्योजक, क्रेडाई
गावापासून दूर घरे स्वस्त, पण जाणे-येणे महाग
शहराच्या हद्दीपासून अवघ्या दोन ते तीन किलोमीटर अंतरावर मोठा गृहप्रकल्प साकार होत आहे. त्वरा करा.. ओपन फ्लॅट बुकिंग करा किंवा रो-हाऊसेस बुकिंग करा..अशा जाहिराती अलीकडच्या काळात सोलापूर शहर परिसरात मोठ्या प्रमाणात दिसताहेत. शहराच्या हद्दीपासून लांब असलेल्या गृहप्रकल्पातील घरे शहराच्या तुलनेत स्वस्त आहेत. रोज जाणे-येणे परवडत नसल्यामुळे शहराबाहेरील प्रकल्पांना प्रतिसाद मिळेना.