बरे झाले गृहमंत्री अमितभाई येऊन गेले, सोफासेट तर सोडाच दरवाजेही बदलले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2019 10:57 AM2019-09-03T10:57:40+5:302019-09-03T12:38:56+5:30
शासकीय विश्रामधाम : २० लाख खर्चून रस्ते, जुन्या इमारतीला केली रंगरंगोटी
राजकुमार सारोळे
सोलापूर : बरे झाले, केंद्रीय गृहमंत्री अमित शहासोलापूरला येऊन गेले, शासकीय विश्रामधाममधील जुन्या इमारतींचे भाग्य उजळले. या कक्षातील सोफासेट तर सोडा दरवाजेही बदलण्यात आले आहेत.
शासकीय विश्रामधाममधील जुन्या इमारतींची अवस्था वाईट झाली होती. इमारतीबरोबर आत असलेल्या कक्षाचा रंग निघून गेला होता. आत पाहुण्यांसाठी ठेवण्यात आलेले सोफासेट तुटलेले, गाद्या फाटलेल्या, मळक्या उषा, बेडसीट, चादरची अवस्था तर विचारायला नको अशी होती.
खिडक्यांचे पडदे फाटून गेलेले. बाथरुमची दुरवस्था, वातानुकूलित यंत्रणा नुसती शोभेलाच दिसत होती. जुन्या दगडी इमारतीतील भोगावती, बोरी या कक्षांची अवस्था तर अत्यंत बिकट होती. आलेले व्हीआयपी या कक्षाऐवजी पुष्कराजमधील कक्षाची मागणी करीत होते. पण पुष्कराजमधील कक्ष पालकमंत्री, सहकारमंत्री यांच्या नावे राखीव असल्याने नाईलाजाने पाहुण्यांना निशिगंध या कक्षांचा आधार घ्यावा लागत होता.
रात्री आलेले पाहुणे चादर, बेडसीट, तुटलेल्या सोफासेटबद्दल तक्रार केल्यावर कर्मचारी आम्ही काय करणार इथे अशीच अवस्था आहे, असे उत्तर द्यायचे. निधीची तरतूद होत नसल्याच्या अडचणी सांगितल्या जात होत्या. महाजनादेश यात्रेच्या समारोपनिमित्ताने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुक्कामाला येणार म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे शासकीय विश्रामधामचे सुशोभीकरण हाती घेण्यात आले.
मुख्य प्रवेशद्वार ते दगडी इमारतीपर्यंत डांबरीकरण करण्यात आले. नवीन पुष्कराज इमारतीतील सर्व कक्षाचे पडदे बदलण्यात आले व इतर साफसफाई करण्यात आली. समोर कौलारू इमारतीची रंगरंगोटी करण्यात आली.
या इमारतीतील सर्व कक्षाचे दरवाजे बदलण्यात आले. इतकेच काय आतील जुने सोफासेट काढून टाकण्यात आले. कक्षाला नवीन रंग, स्वच्छतागृहाची दुरुस्ती करण्यात आली. खिडक्यांचे पडदे, गाद्या, बेडसीट, चादरी बदलण्यात आल्या. वातानुकूलित यंत्रणाही दुरुस्त करण्यात आली आहे. दगडी इमारतीतील भोगावती व बोरी कक्षातील जुन्या वस्तू बदलण्यात आल्या. या दौºयामुळे तीन इमारतींचे भाग्य उजळले आहे. आणखी चार इमारती दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत.
सात वर्षांनंतर नूतनीकरण
- कौलारू व दगडी इमारतीतील कक्षांची दुरवस्था झाली होती. सात वर्षांपासून दुरुस्ती व देखभाल होत नव्हती. पंढरपुरात अखिल भारतीय नाट्य संमेलन झाले, त्यावेळी राज्यभरातून पाहुणे येणार असल्याने रंगरंगोटी झाली होती, असे सांगण्यात आले. त्यानंतर गेल्या दोन वर्षांपासून दुरुस्तीबाबत पाठपुरावा सुरू होता. विश्रामगृहात मुक्कामासाठी येणारे पाहुणे दुरवस्था पाहून नाराजी व्यक्त करीत होते.
धार्मिक पर्यटन व इतर कामानिमित्त राज्यभरातून लोकांची वर्दळ आहे. त्या मानाने सुट चांगले नाहीत, अशा वारंवार तक्रारी होत्या. व्हीआयपींच्या दौºयामुळे महत्त्वाच्या सुटची डागडुजी करण्यासाठी सुमारे २0 लाख खर्च केला आहे. इतर खोल्यांचीही लवकरच दुरुस्ती करण्यात येणार आहे.
-संतोष शेलार, अधीक्षक अभियंता, बांधकाम विभाग