माणसाची अन् समाजाच्या काळजीसाठी होम क्वारंटाईन...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2020 01:41 PM2020-04-21T13:41:33+5:302020-04-21T13:42:00+5:30
चौदाशेव्या शतकात प्लेगची साथ जोरावर असताना असे 'क्वारंटाईन' केले जाई.
‘क्वारंटाईन’ हा शब्द मुळातच इटालियन, फ्रेंच आणि लॅटिन भाषेत आपले उगमस्थान दर्शिवतो. ‘क्वारंटाईन’ या शब्दाचा शब्दश: अर्थ चाळीस दिवस असा होतो . या शब्दाचा वापर संसर्गजन्य रोगाची लागण झाल्याची शक्यता तपासण्यासाठी निरोगी किंवा लागण झालेल्या माणसाला इतरांपासून चाळीस दिवस वेगळे ठेवणे या अर्थाने केला जाऊ लागला. जेणेकरून त्याच्या हालचालीमुळे इतरांना त्या रोगाची लागण होणार नाही. चौदाशेव्या शतकात प्लेगची साथ जोरावर असताना असे 'क्वारंटाईन' केले जाई.
सध्या देश- परदेश जहाजावर काम करणाºया लोकांना समुद्राच्या संपर्कात खूप दिवस राहिल्यामुळे एखादा संसर्ग तर झाला नाही ना? हे तपासण्यासाठी ‘क्वारंटाईन’ केले जाते. त्या माणसाची आणि समाजाची काळजी घेण्यासाठी .
साथीचे रोग आणि ‘क्वारंटाईन’ हा शब्द यांचा निकटचा संबंध आहे. ‘नोवेल कोविड १९’ या विषाणू ने जगभर थैमान घातले आहे. यावर कोणताही वैद्यकीय कायम स्वरुपी इलाज नसल्यामुळे सर्व सरकारांनी स्वत:ला होम क्वारंटाईन करा आणि स्वत:चे व इतरांचे प्राण वाचवा असे आवाहन केले आहे. आम्हा बहुतांश जनतेला सरकारचे आवाहन म्हणजे सरकारने जनतेवर केलेला जुलूम वाटत आहे. खरे तर सरकारपेक्षा जास्त आपण आपली काळजी घेणे हे सुसंस्कृत पणाचे लक्षण आहे. हे लक्षण च आपण साक्षरते कडून सुशिक्षित होण्याकडे प्रवाहित झालो आहोत याचे प्रमाण आहे.
काही जण आनंदाने सरकारच्या सूचनेचे पालन करत आहेत.त्याला प्रतिसाद देत आहेत. काहीजण व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली पोलिसांचा प्रसाद खात आहेत. ही परिस्थिती कोंडी न समजता संधी समजली पाहिजे.स्वत:ला शोधण्याची आणि नव्याने पुन्हा एकदा स्वत:ची ओळख करून घेण्याची.
शाळा,महाविद्यालय,नोकरी,व्यवसाय,जवाबदारी,कर्तव्य आणि वैयक्तिक दिसलेले आयुष्य जगण्यात स्वत्व हरवले आहे. बºयाचदा शोधायला गेले की सापडत नाही. नाही सापडले की शोधायला वेळ मिळत नाही.पुन्हा जीवनगाणे सुरू होते तेच ते, नको ते आणि हवे ते मिळवण्याची स्पर्धा करणारे.
जीवन म्हणजे एक आनंद यात्रा आहे.ती एक अनुभव शाळा आहे.मनसोक्त पण सामाजिक भान ठेवून जगण्याची.
काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी सोडून द्यावे लागले आहे हे आता तरी मान्य करायलाच पाहिजे. निसर्ग सर्वात बलवान आहे.नियतीच्या अधीन राहून जगाचे नियमन करणारी यंत्रणा म्हणजे निसर्गच... मागील शेकडो वर्षात माणसाला स्वत:चे पुनरावलोकन करण्याची संधी क्वचितच उपलब्ध झाली होती. अनिवार्य पद्धतीने ही संधी अख्ख्या जगाला निसगार्ने उपलब्ध करून दिली आहे.संधी प्रत्येकाच्या आयुष्यात येते आणि जाते.कुणाला ती दिसते तर कुणाला दिसत नाही. मग संधीचे सोने आणि संधीची माती हे परिणाम पुढे येतात नेहमीसाठी.
चला आपण ह्या संधीचे घरी बसून सोने करू या. आयुष्यात जे हरवले आहे त्याचा शोध घेवू या; जे चुकले आहे ते बरोबर करू या; जे अर्धवट आहे ते पूर्ण करू या;जे बिघडले आहे ते दुरुस्त करू या...
उभ्या जन्मात अशी संधी,असा निवांत वेळ पुन्हा येणे नाही स्वत:ला शोधण्यासाठी. विस्कटलेली घडी पुन्हा बसवण्यासाठी रुसलेल्या नात्याना शोधायला, हरवलेल्या छंदाला जोपासायला आणि माणूस म्हणून जगायला दुसरा जन्म मिळणार नाही म्हणून प्लीज असे म्हणून तर बघा होम क्वारंटाईन म्हणून तर होईल सगळे फाईन...
- सुनील शेळगावकर