परदेशातून सोलापुरात आलेले घरातच; आरोग्य कर्मचारी अन् पोलिसांचा असणार वॉच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2021 07:18 PM2021-12-08T19:18:32+5:302021-12-08T19:18:39+5:30
ओमायक्रॉनची चिंता : टेस्ट निगेटीव्ह आली तरी ४४ जण राहणार १४ दिवस हाेमक्वारंटाईन
सोलापूर : परदेशातून सोलापूर जिल्ह्यात आलेल्या ४४ जणांची कोरोनाची पहिली चाचणी निगेटीव्ह आली तरी दुसरी चाचणी होईपर्यंत त्यांना घरातच विलगीकरण कक्षात १४ दिवस रहावे लागणार आहे. तोवर त्यांच्यावर आरोग्य कर्मचारी व पोलिसांचा वॉच राहणार आहे.
परदेशातून देशात परतलेल्यांना कोरोनाच्या ओमायक्रॉन या नव्या विषाणूची लागण झाल्याचे आढळले आहे. या पार्श्वभूमीवर परदेशातून ग्रामीण भागात आलेल्या १२ व शहरात परतलेल्या ३२ अशा ४४ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. सर्वांचे अहवाल निगेटीव्ह आले असून आता त्यांना सात दिवस होम क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. ते घराबाहेर पडू नयेत यासाठी पोलीस व आरोग्य कर्मचाऱ्यांचा वॉच राहणार आहे. सात दिवसांनंतर त्यांची पुन्हा चाचणी करून आणखी सात दिवस होम क्वारंटाईन ठेवण्यात येणार आहे. परदेश दौऱ्यावरून नागरिक परतल्याने जिल्हा व महापालिका आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. त्या नागरिकांच्या आरोग्याची दररोज खबरबात ठेवण्यात येत आहे.
सोलापूर शहरात सर्वाधिक संख्या
सोलापूर ग्रामीणमधील १२ व शहरातील ३२ जण आहेत. बार्शी : ४ (पाेलंड), माळशिरस : ५ (युके : ३, जाॅर्जीया : २), सांगोला : १ (युके), पंढरपूर : १ (जाॅर्जीया), मोहोळ : १ (युएई), सोलापूर शहर : ३२ (आयर्लंड : ४, जपान : १, युएई : १७, युके : २, युएसए : ४, नेदरलँड : ३)
आरोग्य विभागाकडून संदेश आल्यावर तपासणी
हे प्रवासी विमानाहून परदेशातून परतल्यानंतर विमानतळावरही त्यांची चाचणी करण्यात आली आहे. त्यानंतर राज्य आरोग्य विभागाकडे यादी आल्यावर संबंधित जिल्हा आरोग्य विभागाकडे कळविण्यात येत आहे. त्याप्रमाणे जिल्हा आरोग्य विभागाने या प्रवाशांचा शोध घेऊन तपासणी केली. अहवाल निगेटीव्ह आल्याने पुढील १४ दिवस त्यांना निगराणीखाली ठेवण्यात आले आहे.
टेस्ट निगेटीव्ह तरीही सतर्कता
परदेशातून आलेल्या ४४ जणांची आरटीपीसीआर चाचणी निगेटीव्ह आली तरी ते हायरिस्क देशातून आल्याने १४ दिवस त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात येणार आहे. त्यांना थोडाही त्रास जाणवला तर तातडीने आराेग्य विभागाला माहिती देण्याबाबत कळविण्यात आले आहे.
हायरिस्क देशातून आले ६ जण
हायरिस्कमध्ये दक्षिण आफ्रिका, बेल्जियम, युके हे देश येत आहेत. युकेमधील सहाजण परतले आहेत. त्यांची चाचणी निगेटीव्ह आली आहे. यातील दोन मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी आहेत. कोणालाच कसल्याही प्रकारचा त्रास नाही. त्यामुळे चिंतेचे कारण नाही असे आरोग्य विभागाने म्हटले आहे.
परदेशातून येणाऱ्या प्रवाशांवर करडी नजर
ओमायक्रानचा शिरकाव होऊ नये म्हणून परदेशातून येणाऱ्या प्रवशांवर आरोग्य विभागाने करडी नजर ठेवली आहे. विमानतळावरून हे प्रवासी निघाल्यापासून राज्य आरोग्य विभागाने माहिती पुरविली आहे. त्याप्रमाणे त्यांचा शोध घेऊन लक्ष ठेवण्यात येत आहे.
डॉ. शीतलकुमार जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी