होमगार्ड भरतीसाठी एम.ए., एम.एस्सी अन् बी.एड. शिक्षण घेतलेल्या उमेदवारांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2019 12:11 PM2019-07-26T12:11:32+5:302019-07-26T12:13:37+5:30
सोलापूर ग्रामीण पोलीस दल; ४३३ जागेसाठी ४ हजार अर्ज दाखल
सोलापूर : सोलापूर जिल्हा होमगार्ड कार्यालयाच्या अधिनस्त आयोजित होमगार्ड नोंदणीसाठी सुमारे ४ हजार तरुणांनी हजेरी लावली होती. २ हजार ७१५ जणांनी मैदानी परीक्षा दिली असून त्यात एम.ए., एम.एस्सी. अन् बी.एड. शिक्षण झालेल्यांचा समावेश आहे.
२४ व २५ जुलै रोजी होमगार्डचे जिल्हा समादेशक तथा अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली, सोलापूर ग्रामीण पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर होमगार्ड नोंदणीचा कार्यक्रम राबविण्यात आला. शारीरिक चाचणी केगाव पोलीस प्रशिक्षण केंद्र येथे घेण्यात आली. या कालावधीत सकाळी ६ ते १२ वाजेपर्यंत पोलीस प्रशिक्षण केंद्र ते हिरज गावादरम्यान धावण्याची चाचणी घेण्यात आली.
पहिल्या दिवशी २४ जुलै रोजी ग्रामीण मुख्यालयाच्या मैदानावर नोंदणीसाठी मोठी गर्दी झाली होती. एकूण ४३३ होमगार्ड नोंदणीसाठी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतून एकूण सुमारे ४ हजारांच्या आसपास तरुण व तरुणी आल्या होत्या. कागदपत्र पडताळणीमध्ये २ हजार ७१५ उमेदवारांची चाचणी घेण्यात आली. यामध्ये २०९ महिलांचा समावेश आहे. पहिल्या दिवशी रात्री ११ तर दुसºया दिवशी सायंकाळी ६ वाजेपर्यंत ही प्रक्रिया चालली.